कोपरगावात पोहेगावजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू

कोपरगाव तालुक्यातील पोहेगावजवळ कोपरगाव-संगमनेर मार्गावर गोदावरीच्या उजव्या कॅनॉलजवळ एका अज्ञात वाहनाच्या धडकेत एका बिबट्याचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती स्थानिक ग्रामस्थांनी वनविभागाला दिली असता वन विभागाचे अधिकारी मंगळवारी सकाळी बिबट्याचा मृतदेह घेऊन गेले आहेत.

पोहेगाव परिसरात बिबट्यांचा वावर असल्याच्या अनेक बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. या बिबट्याला जेरबंद करून जंगलात सोडण्यासाठी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना वेळोवेळी सांगण्यात आले होते. मात्र, वन विभागाने पिंजरा लावण्यात असमर्थता दाखवली होती. जर या परिसरात पिंजरा लावला असता तर बिबट्याचे प्राण वाचले असते असे स्थानिक नागरिकांकडून सांगण्यात येत आहे.