
मौजे देव्हारे येथील स्थानिक नागरिक श्रीधर खैरे यांच्या काजू बागायतीमध्ये फासकीत अडकलेल्या बिबट्याला वनविभागाकडून जीवदान देण्यात आले आहे. ही घटना आज सायंकाळी 4.30 वाजता घडली आहे.
मिळालेल्या माहितीवरुन, बिबट्या अडकल्याची माहिती मिळाल्यानंतर वनपाल मंडणगड, वनरक्षक देव्हारे यांनी तत्काळ घटनास्थळी जावून पाहणी केली. मौजे देव्हारे आतले रस्त्यालगत असलेल्या काजू बागायतीमध्ये दोन ते तीन वर्षांचा नर जातीचा बिबट्या फासकीच्या तारेमध्ये अडकल्याचे दिसून आले. वनपाल मंडणगड यांनी याबाबतची माहिती वैभव बोराटे, परिक्षेत्र वन अधिकारी दापोली यांना दिली. त्यानंतर परिक्षेत्र वन अधिकारी दापोली, वनपाल दापोली, वनपाल खेड यांनी तात्काळ लोखंडी पिंजरा व वन्यप्राणी बचाव साहित्य घेवून घटनास्थळी दाखल झाले.
वन्यप्राणी बचाव पथकाने, लोखंडी पिंजरा लावून फासकीत अडकलेल्या बिबटयाला सुरक्षीत ताब्यात घेतले. त्यानंतर पिंजऱ्यासह बिबटयास खाजगी वाहनांमध्ये घेवून पशुधन विकास अधिकारी मंडणगड यांच्याकडून बिबट्याची वैद्यकीय तपासणी केली. हा बिबट्या वन्यप्राणी नैसर्गिक अधिवासात सोडण्यास सुस्थितीत असल्यावर नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आले. याप्रकरणी वनपाल मंडणगड यांनी अज्ञात व्यक्तीच्या विरोधात वन्यजीव (संरक्षण) अधिनियम 1972 अन्वये गुन्हा नोंद केला आहे. या प्रकरणांचा पुढील तपास वैभव बोराटे, सहाय्यक वन्यजीव प्रतिपालक तथा परिक्षेत्र वन अधिकारी दापोली करीत आहेत.
ही कारवाई दिपक खाडे, विभागीय वन अधिकारी रत्नागिरी (चिपळूण), सचिन निलख सहाय्यक वनसंरक्षक (प्रा) रत्नागिरी (चिपळूण) यांच्या मार्गदर्शनाखाली वैभव बोराटे, परिक्षेत्र वन अधिकारी दापोली, अ. रा. दळवी, वनपाल मंडणगड, सुरेश उपरे, वनपाल खेड, सा.स. सावंत, वनपाल दापोली तसेच वनरक्षक देव्हारे, पालघर यांनी पार पाडली आहे.



























































