
सामना प्रतिनिधी, नाशिक
नाशिकच्या सावरकरनगर परिसरात 25 जानेवारीला शिरलेल्या बिबटय़ाने चौघांना जखमी केले होते. ही घटना ताजी असतानाच आज पाईपलाईन रोड भागात पुन्हा बिबटय़ाचा संचार आढळून आल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. वनविभागाने गोवर्धनसह तीन ठिकाणी पिंजरे लावले आहेत. नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
सावरकरनगर या भागात 25 जानेवारी रोजी सकाळच्या सुमारास बिबटय़ा शिरल्याने खळबळ उडाली होती. वनविभागाने त्याला अडीच तासांच्या शर्थीच्या प्रयत्नांनंतर जेरबंद केले. दरम्यान, बिबटय़ा रस्ता ओलांडताना दिसला. आज पाईपलाईन रोड भागात विसडम् हाय शाळेजवळ नागरिकांना बिबटय़ा रस्ता ओलांडताना दिसला. याबाबत माहिती मिळाल्यानंतर वनविभागाने गस्त वाढविली. शिवसेना नगरसेवक विलास शिंदे, नयन गांगुर्डे यांनी वनविभागाच्या पथकासह या भागात जावून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले.




























































