
सामना प्रतिनिधी । उरण
उरण तालुक्यातील वाघधोंडी परिसरातील डोंगर परिसरात मंगळवारी ( १६) वाघधोंडी डोंगर परिसरात वसलेल्या कंटेनर यार्डमध्ये काम करणाऱ्या बाळा ठाकूर (रा.चिरनेर) या कामगाराला एक बिबट्या गुरांच्या मागे धावताना दिसल्याच्या चर्चेमुळे परिसरात घबराटीचे वातावरण पसरले आहे.
उरण तालुका हा अरबी समुद्रा जवळ वसलेला तालुका आहे. या तालुक्यातील अनेक गावे ही डोंगर परिसरात वसलेली आहेत. मागील काही वर्षांपूर्वी या डोंगर परिसरात बिबट्याचा, मोर, रान डुक्कर, ससे, हरिण, भेकर सारख्या जंगलातील प्राण्याचा मोठ्या प्रमाणात वावर असे. परंतु सातत्याने होत असलेली शिकार आणि वाढत्या औद्योगिकीकरण व डोंगर परिसरात अतिशय वेगाने होणाऱ्या मातीच्या उत्खननामुळे जंगल संपत्तीचा मोठ्या प्रमाणावर ऱ्हास झाला आहे. तसेच जंगलातील प्राण्यांच्या जिवीतास धोका निर्माण झाला असून हळूहळू त्यांचे अस्तित्व संपुष्टात येऊ लागले आहे. त्यामुळे जंगल संपत्तीच्या, प्राण्याच्या ऱ्हासाला सर्वश्री वन विभागाचे अधिकारी जबाबदार असल्याचा आरोप केला जात आहे.
या तालुक्यातील डोगर परिसरात बिबटेच नसल्याचा जावई शोध दहा वर्षापूर्वी वन विभागाने लावला होता. त्यावेळी वन विभागाच्या या जावई शोधाला चक्क करंजा गावात शिरलेल्या बिबट्याने हरताळ फासला होता. त्यात मंगळवारी (दि. १६) वाघधोंडी डोंगर परिसरात वसलेल्या कंटेनर यार्डमध्ये काम करणाऱ्या चिरनेर गावातील बाळा ठाकूर या कामगाराला गुरांच्या मागे धावताना बिबट्या दिसल्याच्या चर्चेने परिसरात घबराटीचे वातावरण पसरले आहे. भयभीत झालेल्या सदर कामगारांनी या बिबट्याची खबर यार्डचे सुरक्षा रक्षक यांना दिली.
दरम्यान, उरण परिसरात बिबट्याचा वावर असल्याची माहिती अद्याप तरी वनविभागाला कुणीही कळविलेली नाही. तसेच नुकत्याच झालेल्या पशू गणनेतही उरण परिसरातील जंगलात बिबट्याचे अस्तित्व आढळून आलेले नसल्याची माहिती उरण वन विभागाचे अधिकारी शशांक कदम यांनी दिली आहे. वनविभागाच्या स्पष्टीकरणामुळे या बिबट्याच्या वावराबाबत संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे.
































































