खंडाळ्याच्या गारमाळमध्ये बिबट्याचा मॉर्निंग वॉक; सकाळी फेरफटका मारणाऱ्यांची पाचावर धारण बसली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पहाटेची वेळ… रस्त्याच्या दोन्ही बाजूला घनदाट जंगल… दाट धुके… खोपोलीतील दोन तरुण खंडाळ्याच्या गारमाळ परिसरात मॉर्निंग वॉकसाठी गेले होते. त्याच वेळी बिबट्याने त्यांच्या पुढ्यात उडी मारली. बिबट्याचाही मॉर्निंग वॉक बघून दोघांचा थरकाप उडाला. तरुणांनी मिळेल त्या रस्त्याने जीव मुठीत घेऊन धूम ठोकली. पळत असताना पडून यातील एक तरुण जखमी झाला.

गारमाळमध्ये बिबट्याची दहशत वाढली असून परिसरातील नागरिकांची पाचावर धारण बसली आहे. घाटमाथ्यावर असलेल्या गारमाळ परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून बिबट्याचा वावर वाढला आहे. शनिवारी पहाटे खोपोलीतील दोन तरुण मार्निंग वॉकसाठी गारमाळच्या जंगलातील रस्त्याने जात होते. थोडे पुढे गेल्यानंतर अचानक त्यांच्यासमोर बिबट्या आला. काही क्षण काय करावे हे दोघांना समजले नाही. मात्र क्षणाचाही विलंब न करता त्या दोघांनी पळ काढला. बिबट्याही त्या ठिकाणाहून फरार झाला. या घटनेमुळे मॉर्निंग वॉकसाठी जाणाऱ्या गावकऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

बंदोबस्त करण्याची मागणी
दोन दिवसांपूर्वी गारमाळच्या रस्त्यावर बिबट्या दहा मिनिटे तळ ठोकून बिबट्या बसला होता. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. बिबट्या आपल्या विभागात वावरत असल्याने आपल्यावर बिबट्याचा हल्ला होऊ नये म्हणून नियमांचे पालन करून जनावरांची काळजी घ्यावी असे आवाहन खोपोली वनविभागाचे अधिकारी भगवान दळवी यांनी केले आहे. या बिबट्याचा त्वरित बंदोबस्त करावा, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.