
संगमनेर तालुक्यातील आंबी दुमाला येथे गुरुवारी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास बिबट्याने केलेल्या हल्ल्यात अनिल संभाजी मधे हा तरुण जखमी झाला होता. यानंतर वन विभागाने परिसरात पिंजरा लावला होता. शुक्रवारी पहाटे बिबट्याची मादी या पिंजऱ्यामध्ये अखेर जेरबंद झाली आहे. त्यामुळे ग्रामस्थांचा जीव भांड्यात पडला आहे.
आंबी दुमाला येथील शिंदेवस्तीवर सावकार शिंदे यांची शेती अनिल मधे वाट्य़ाने करतात. या शेतात ते कांद्याच्या रोपाला पाणी भरत होते. यावेळी दबा धरून बसलेल्या बिबटय़ाने अचानक हल्ला करून त्यांना खाली पाडले. त्यात मधे जखमी झाल्याने त्यांना उपचारांसाठी बोटा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले होते. यावेळी ग्रामस्थांनी पिंजरा लावण्याची मागणी वन विभागाकडे केली होती. वन विभागाने तत्काळ पिंजरा लावला होता.
शुक्रवारी पहाटे भक्ष्याच्या शोधात आलेली बिबट्य़ाची मादी पिंजऱ्यात जेरबंद झाली. पिंजऱ्यातून बाहेर येण्यासाठी धडपड केल्याने ती जखमी झाली. यात पिंजऱ्याचे गज वाकल्याने बिबटय़ाची मादी बाहेर येण्याची शक्यता निर्माण झाली होती. वन विभागाचे वनपरिमंडल अधिकारी रामदास थेटे यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक दिलीप उचाळे, बाळासाहेब वैराळ, सुभाष धानापुने आदींनी दुसरा पिंजरा लावला. त्यात बिबटय़ाची मादी जेरबंद झाली. या मादीची रवानगी चंदनापुरी येथील निसर्ग परिचय केंद्रात करण्यात आली आहे.




























































