नरभक्षक बिबट्याचा वनविभागाच्या कर्मचाऱ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
leopard

आष्टी तालुक्यात नरभक्षक बिबट्याला जेरबंद करण्यासाठी तैनात असलेले वनविभागाचे कर्मचारी बबन गुंजाळ यांच्यावर बिबट्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र, वनविभागाच्या कर्मचाऱ्यांचा ताफा पाहून बिबट्याने पळ काढला.

तालुक्यात एकाच आठवड्यात बिबट्याने दोन जणांचे बळी घेतले आहेत. या नरभक्षक बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वनविभागाचे कसोशीने प्रयत्न सुरू आहेत. सुरुडी येथील घटना झालेनंतर अवघ्या दोन दिवसात किन्ही येथील 11 वर्षांच्या मुलावर बिबट्याने हल्ला करत त्याला ठार केल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वनविभागाच्या पथकाने शोध मोहीम सुरु केली आहे. किन्ही येथे झालेल्या घटनेच्या दिशेने बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाच्या पथकाची शोधमोहीम सुरू असताना तुरीच्या पिकात दबा धरून बसलेल्या बिबट्याने डरकाळी फोडत वनरक्षक बबन गुंजाळ यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र, वनविभागाच्या कर्मचाऱ्यांचे पथक पाहून बिबट्याने तुरीच्या पिकातून पळ काढला. बिबट्याला जेरबंद करण्यासाठी संभाजीनगर, अमरावती, परळी, धारूर, पाटोदा येथील वनविभागाच्या पथकाला बोलावण्यात आले आहे.