महाराष्ट्रातील उद्योगधंदे गुजरातला पळवल्यानंतर आता महाराष्ट्रातून बिबटेही गुजरातला पळवले जात आहेत. जुन्नर परिसरात पकडण्यात आलेल्या दहा बिबटय़ांची गुजरातमधील जामनगरमध्ये रवानगी करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री व पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत.
जुन्नर तालुक्यात अलीकडच्या काळात बिबटय़ांची संख्या प्रचंड वाढली आहे. बिबटय़ांचे मानवी वस्तीवर हल्लेही वाढले आहेत. त्यामुळे मानव व बिबटय़ा संघर्षावर उपाय योजण्यासाठी एका समितीची स्थापना करण्यात आली आहे. दुसरीकडे बिबटे पकडण्यासाठी वन विभागाने विशेष कृती दल तयार करून नगदवाडी आणि पिंपरखेडमध्ये बेस पँप केले. बिबटे पकडण्यासाठी पिंजऱयांची संख्या वाढवण्यात येणार आहे. सध्या वन विभागाकडे दीडशे पिंजरे असून या पिंजऱयांची संख्या तीनशेपर्यंत नेण्याची योजना आहे.
दरम्यान, विशेष कृती दलाने जुन्नर परिसरात मागील पंधरा दिवसांत 21 बिबटे पकडले असून त्यातील दहा बिबटय़ांची रवानगी गुजरातमधील जामनगरमध्ये करण्यात येणार आहे. पालकमंत्री अजित पवार यांच्या आदेशानंतर हे बिबटे गुजरातला पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
– बिबटय़ांच्या वाढत्या हल्ल्यांचे विधानसभेतही पडसाद उमटले होते. अनेक आमदारांनी या विषयावर चर्चा घडवून आणली होती. बिबटय़ांच्या हल्ल्यांत आतापर्यंत अनेकांचा जीव गेला आहे. त्यामुळे बिबटय़ांच्या हल्ल्यांवर उपाय योजण्याची मागणी आमदारांनी केली आहे. या पार्श्वभूमीवर जुन्नरमधल्या माणिकडोह येथील बिबट निवार पेंद्राचे पुढील तीन महिन्यांत विस्तारीकरण करण्यात येणार आहे. या पेंद्रातील बिबटय़ांची संख्या वाढवून 110 करण्यात येईल. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून वन विभागासाठी नवीन सात गाडय़ा देण्यात येणार आहेत. बेस पँपसाठी जाळे, काठय़ा,बॅटरी, ट्रँक्युलायझिंग गन, ड्रोन पॅमेरे पुरवण्यात येणार आहेत. धनगरवाडय़ांसाठी तंबू, बॅटरी पुरवण्यात येणार आहेत.
सोशल मीडियावर ट्रोल
महाराष्ट्राचे बिबटे गुजरातला नेण्याच्या निर्णयावरून भाजप आणि मिंधे सरकारला सोशल मीडियावर चांगलेच ट्रोल केले आहे. ‘आतापर्यंत मोठे प्रकल्प गुजरातला पळवून नेले… नकली वाघ व्हाया सुरत, गुवाहाटी गोव्याला नेलाच, आता बिबटय़ांवर पण हात टाकण्याइतपत भीड चेपलेली दिसत आहे…’ अशा शब्दांत भाजप व महायुतीच्या नेत्यांना महाराष्ट्रप्रेमींनी सोशल मीडियावर झोडले आहे.