
राजेश चुरी
सध्याची बैठी जीवनशैली, व्यायामाचा अभाव आणि कामाचा ताण यामुळे राज्यातील अनेक मंत्र्यांसह मंत्रालयातील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांमध्ये मधुमेहाचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे मधुमेहाला नियंत्रणात ठेवण्यासाठी मंत्रालयाच्या कॅण्टीनमध्ये चिनी कम पॅटर्न राबवण्यास सुरुवात झाली आहे. म्हणजे कॅण्टीनमधील चहा-कॉफीमधील साखरेचे प्रमाण कमी केले आहे. त्याचबरोबर शिरा आणि उपवासांच्या पदार्थांमधील गोडवा कमी करण्यास सुरुवात केली आहे. या माध्यमातून मंत्रालयीन कर्मचाऱ्यांमधील शुगर नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. केवळ मंत्रालय नव्हे तर विधान भवनापासून नवी मुंबईतल्या कोकण भवनमध्येही ‘चिनी कम’चा प्रयोग सुरू आहे.
सध्याच्या बदलत्या जीवनशैलीमुळे मधुमेहाचे प्रमाण समाजाच्या सर्वच स्तरात वाढत आहे. त्यामुळे आहारातील साखरेचे प्रमाण कमी करण्यासाठी केंद्र सरकारनेच मोहीम राबविण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून मंत्रालयाच्या कॅण्टीनमध्येही साखरेचा वापर कमी करण्यास मागील सहा महिन्यांपासून सुरुवात झाली आहे. सामान्य प्रशासन विभागातील सह सचिव दर्जाच्या अधिकाऱ्याने याबाबत सहा महिन्यांपूर्वीच तोंडी सूचना दिल्या. त्यानंतर कॅण्टीनमधील साखरेचा वापर कमी करण्यास सुरुवात झाली. चहा-कॉफी तयार करताना साखरेचे प्रमाण कमी करण्यासाठी कॅण्टीनमधील आचाऱ्यांचीही मानसिक तयारी करण्यात आली.
कारण साखरेचे सेवन आरोग्यास हानीकारक असल्याची अनेकांना आता जाणीव झाली आहे. त्यातच बहुतांश कर्मचाऱ्यांमध्ये व्यायामाचा अभाव आहे. त्यामुळे साखरेचे प्रमाण कमी केल्यास आरोग्याला फायदाच होईल याची जाणीव अनेक कर्मचाऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे.
90 टक्के कर्मचाऱ्यांचा पाठिंबा
याबाबाबत सरकारी पातळीवर कोणतेही लेखी आदेश नाहीत. केवळ कर्मचाऱ्यांच्या हितासाठी हा निर्णय घेतल्याचे सामान्य प्रशासन विभागातील अधिकाऱ्याने नाव उघड न करण्याच्या अटीवर ही माहिती दिली. सरकारमध्ये सुरुवातीला कोणताही योजना प्रायोगिक तत्त्वावर राबवली जाते, पण 90 टक्के कर्मचाऱ्यांचा पाठिंबा असल्याने ‘चिनी कम’ पॅटर्न पुढे सुरूच ठेवला जाईल असे सांगण्यात येते.
मंत्र्यांकडूनही ‘चिनी कम’ची मागणी
मधुमेहाचे प्रमाण केवळ मंत्रालयीन कर्मचाऱ्यांमध्ये अधिक नाही तर अनेक मंत्र्यांना मधुमेहाचा त्रास आहे. त्यामुळे मंत्रीही ‘चिनी कम’ चहाची मागणी करतात. त्यामुळे मंत्र्यांनाही चहा -कॉफी पुरवताना कमी गोड किंवा साखरेविना चहा पुरवला जातो. केवळ मंत्रालयातील नव्हे तर विधान भवनातील कॅण्टीनमध्येही चिनी कम चहा पुरवला जातो. नवी मुंबईतल्या कोकण भवनमध्येही चिनी कम पॅटर्न राबविण्यात येत आहे.
चहाची गोडी कमी झाल्यामुळे सुरुवातीला काहींनी खास करून गोड खाणाऱ्यांनी तक्रार केली. पण गोड चहा पाहिजे असल्यास लहान वाटीमध्ये साखर देण्यास सुरुवात झाली. पण बहुतांश कर्मचाऱ्यांनी ‘चिनी कम’ पॅटर्नचे स्वागतच केले.

























































