खाऊगल्ली- चला, मराठी खाद्यपदार्थांच्या दुकानांत

>> संजीव साबडे

आपण उपवास वा श्रावणात, नवरात्री, गणेशोत्सव या काळात वाटेल त्या दुकानातून खाद्य पदार्थ घेत नाही. उपवासाचे आणि अन्य मराठमोळे खाद्यपदार्थ घ्यायचे ते मराठी वा विश्वासार्ह दुकानातूनच ही धारणा त्यामागे असते. त्यामुळेच पुरणपोळी, उकडीचे मोदक, चिरोटे, अनारसे ते वेगवेगळी पिठं, घरगुती मसाले, मेतकूट, चटण्या या पदार्थांविषयी खात्री असणाऱया मराठी खाद्यपदार्थांच्या दुकानातूनच ते घेतले जातात.

विलेपार्ल्यात गेलं की, काही ठिकाणी नक्की जाणं होतं. त्यातलं एक ठिकाण म्हणजे भाजी बाजार. तिथे भाज्या खूप छान व ताज्या मिळतात. त्यामुळे गरज नसली तरी त्या घेतल्या जातात. बाबूचा वडापाव खायचा आणि स्टेशनसमोर थंडगार ताक प्यायचं हेही ठरलेलं असतं. कधी हनुमान रोडच्या पणशीकर यांच्याकडे काही खायचं वा त्यांच्या काऊंटरवरून एखादा पदार्थ पार्सल घ्यायचा. समोरच पंकज फरसाण आणि वेफर्स मार्ट आहे. तिथे नाश्त्याचे, दिवाळीचे आणि उपवासाचे सारे पदार्थ मस्त मिळतात. दुकान गुजराती असलं तरी मराठी ग्राहक अधिक असतात. त्याच्या शेजारच्या इमारतीत खाऊघर आहे. तिथेही पुरणपोळी, उकडीचे मोदक, गोंदगिरी लाडू, चिरोटे, अनारसे असे शेकडो पदार्थ उत्तम मिळतात.

विलेपार्ले स्टेशनच्या जवळ असलेल्या प्रभुकृपा या दुकानात प्रथमच जाणं झालं. तिथे बाजरीचे वडे, उपासाची कचोरी, तेलपोळी, गुळपोळी, पुरणपोळी, हळदीच्या पानातील ताज्या गरम पातोळ्या, ड्रायफ्रूट बर्फी, उनियप्पम आणि इतर अनेक मिठाया व गोड प्रकार अशा असंख्य चमचमीत व खमंग पदार्थांनी गर्दी केली होती. इथेही खरेदी करायला आलेले सर्व मराठीच. काय घ्यावं आणि काय नको, असं होऊन गेलं. समोरच अनेक वर्षांपूर्वी अण्णा साठे यांनी स्रू केलेलं विजय स्टोअर आहे. तिथेही असेच सारे पदार्थ. शिवाय चटण्या व घरगुती मसाले, किसलेलं सुकं खोबरं, खोवलेला नारळ, सुकेळी आणि उपवासाचे अनेक पदार्थ खुणावत असतात. तिथून आपण रिकाम्या हाताने बाहेरच पडू शकत नाही. तिथून जवळ असलेलं चॅम्पियन्स हे दुकानही प्रसिद्ध आणि लोकप्रिय आहे. तिथे तुम्हाला फराळी खाकराही मिळतो. आपल्या मुलांना दिवाळीत फराळाचे पदार्थ पाठवणारे पालक तिथे येतात. तिथे ते फक्त खरेदी करायचे. पुढे खाद्यपदार्थांचा बॉक्स परदेशी हव्या त्या शहरात तुमच्या मुलाच्या घरी कुरियरने पाठवण्याचं काम त्यांचं.दादरच्या डी. एल. वैद्य रोडवर गोडबोले स्टोअर्स आहे. तिथेही पारंपरिक मराठी खाद्यपदार्थ मिळतात. उपासाचे प्रकारही त्यांच्याकडे ठरावीक काळात वा दिवशी असतात. अनेक मराठी आणि हिंदी सेलिब्रेटींचं हे आवडतं दुकान. शिवाजी पार्कवरचं आस्वाद रेस्टॉरंट सर्वांना माहीत आहे. उपासाचे सर्व पदार्थ तिथे मिळतात. त्यामुळे एकादशी, श्रावण व एकूणच चातुर्मासात उपवास ठेवणाऱयांची अधिक गर्दी असते, पण शेजारच्या त्यांच्या मिठाया आणि अन्य खाद्य पदार्थांच्या दुकानात आणखी वेगळे मराठी पदार्थ मिळतात. दिवाळी वा कोणताही सण नसला तरी तिथून अनारसे, चिरोटे न्यायचेच. रेस्टॉरंटमध्ये उपवासाचा श्रावण खाद्यपदार्थांसह तुमची वाट पाहत असतो. आपण उपवास वा श्रावणात, नवरात्री, गणेशोत्सव या काळात वाटेल त्या दुकानातून खाद्य पदार्थ घेत नाही. पूर्वी छोटय़ात छोटा दागिनाही करण्यासाठी मारवाडी नव्हे, तर मराठी सराफाच्या पेढीवरूनच केला जाई. तसंच या खाद्यपदार्थांबाबत. ते घ्यायचे मराठी वा विश्वासार्ह दुकानातूनच.

विलेपार्ले, दादर, गिरगाव, गोरेगाव, मुलुंड, ठाणे, डोंबिवली इथे आजही मराठी मंडळींची वस्ती अधिक आहे. त्यामुळे हवे ते नेहमीचे वा उपासाचे पदार्थ आणि वेगवेगळी पिठं, घरगुती मसाले, मेतकूट, चटण्या मिळणारी मराठी दुकानंही अधिक. गिरगावातलं पणशीकरही मराठी पद्धतीचे तसंच उपासाचे खाद्य पदार्थ आणि मिठाया यासाठी प्रसिद्ध. ठाकुरद्वारात म्हणजे बाबासाहेब जयकर मार्गांवरचं विनय हेल्थ होम मिसळ, वडा, थालीपीठ, खिचडी, साबुदाणा वडा, जैन मिसळ, जैन कोथिंबीर वडी अशा असंख्य पदार्थांसाठी लोकप्रिय आहे. तिथला खरवस आणि मसाला दूधही उत्तम, पण शेजारच्या त्यांच्या दुकानात शिरलं की, मराठी मिठाया पाहून तोंडाला पाणी सुटतं. पश्चिम उपनगरात गोरेगावच्या सप्रे अँड सन्सचंही उपासाचे आणि अन्य कोरडे तिखट पदार्थ, मिठाया यांचं शेजारीच स्वतंत्र दुकान आहे. तिथे अगदी सहज आणि काय काय मिळतं ते पाहायला गेलेलं गिऱहाईक किमान एक पदार्थ तरी घेऊन बाहेर पडतं. तिथे शेजारीच सरस्वती लाडू कारखाना नावाचं जे दुकान आहे, तेही मर्यादित मराठी खाद्यपदार्थांसाठी प्रसिद्ध. जवळच्या त्रिपाठी भवनमध्ये एक लाडू सम्राट आहे, पण लालबागच्या लाडू सम्राटशी त्याचा संबंध नाही.

लालबागच्या लाडू सम्राटचं मराठी खाद्यपदार्थ आणि उपासाच्या प्रकारांचं शेजारीच दुकान आहे. बाकी गिरणगावात लक्षात राहावं असं मराठी रेस्टॉरंट वा दुकान नाही. चिवडा गल्लीत चिवडा व अन्य खाद्य पदार्थांची अनेक दुकानं आहेत, गणपती आणि दिवाळीच्या काळात या चिवडा गल्लीत खूप गर्दी होते. बरेचसे मुंबईतील किरकोळ चिवडावाले या गल्लीत सतत येत असतात. पूर्व उपनगरांतील मुलुंड हे एक मराठी वस्ती आणि मराठी खाद्यपदार्थ मिळणारं महत्त्वाचं ठिकाण, पण सर्व दुकानं पूर्वेला. अगदी विलेपार्ल्यासारखं. पूर्वेला स्टेशनसमोरच गोडबोले यांचं समर्थ टी हाऊस आणि त्या शेजारी रानडे यांचं श्री योगेश्वरी भोजनालय. समर्थमध्ये उत्तम चहा आणि मराठी खाद्यपदार्थ मिळतात. योगेश्वरीच्या दुकानात विविध प्रकारची तसंच भाजणीची पिठं मिळतात. पूर्वेलाच हरिओम नावाची दोन-तीन दुकानं आहेत. तिथला साबुदाणा वडा खायला झुंबड उडते असं ऐकलं, पण तो खाल्ला मात्र नाही. आणखी अन्नपूर्णा हे खाद्यपदार्थांचं दुकानही प्रसिद्ध आहे, पण हरिओमप्रमाणे ते काही मराठी पदार्थांसाठी प्रसिद्ध नाही.

ठाण्यात मात्र गोखले, गोरस, प्रशांत कॉर्नर आणि कुटिरोद्योग मंदिर आणि टीपटॉप ही मराठी खाद्यपदार्थ, उपासाचे कोरडे प्रकार आणि मराठी मिठाया मिळणारी महत्त्वाची ठिकाणं आहेत. टीपटॉप तर डोंबिवलीतही आहे. ठाणे हे मराठी खाद्यपदार्थांचं मोठं केंद्र आहे. शाकाहारी वा मांसाहारी पदार्थ तर इथे उत्तम मिळतातच. पण गोखले, गोरस आणि कुटिरोद्योग हे खास मराठी पदार्थांचं मोठं केंद्रच. गोरसगृह आणि कुटिरोद्योग मंदिरात दुधाचे पदार्थ उत्तम मिळतात, तर गोखले यांच्याकडे मराठी उपासाचे पदार्थ. ठाणे आणि गोखले यांचं खूपच जुनं नातं. शिवाजी पार्कवर गेलं की आस्वादमध्ये, मरीन लाइन्सला असाल तर कयानीमध्ये जायचंच असतं, तसं ठाण्यात गोखले यांच्या उपाहारगृह वा मंगल आहार या दुकानात जायलाच हवं. रेस्टॉरंटची चक्कर नेहमी होतेच. यंदा आयत्या वेळी मदतीला धावून येणाऱया या दुकानाची सैर झाली.

[email protected]