
वाचनसंस्कृती जोपासण्यासाठी अनेक ग्रंथसंग्रहालये सुरू करण्यात आली आहेत. या ग्रंथसंग्रहालयातून पुस्तक घेतल्यानंतर ठकाविक मुदतीत किंवा ते वाचून झाल्यानंतर परत करणे अपेक्षित असते. काहीजण ग्रंथालायातून पुस्तके घेतात आणि नियमित परत करतात. त्यामुळे त्यांची अनेक पुस्तके वाचून होतात. काहीजण मात्र, पुस्तके घेतात आणि परत करायला विरसतात किंवा ती परत करतच नाहीत. ग्रंथसंग्रहालयाकडून अशा सदस्यांना दंड आकारला जातो. मात्र, एका महिलेने ग्रंथसंग्रहालयातून तब्बल 50 वर्षापूर्वी घेतलेले पुस्तक परत केले आहे. या पुस्तकासोबत तिने लिहिलेल्या पत्राची आणि दंडाची चर्चा होत आहे.
पेन्सिल्वेनियामधील एका ग्रंथसंग्रहालयात 50 वर्षांपूर्वी घेतलेले हे पुस्तक परत करण्यात आले आहे. बर्टन हॉब्सनलिखीत “कॉइन्स यू कैन कलेक्ट” या पुस्तकाची 1967 मधील प्रत ग्रंथसंग्रहालयाला पाठवण्यात आली. पुस्तकासोबत एक पत्र आणि सुमारे 20 डॉलरचा (1,483 रुपयांचा) दंडही पाठवण्यात आला होता. एवढ्या वर्षानंतर पुस्तक परत केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहेच. पण त्यासोबत दंड आणि पत्रही पाठवण्यात आल्याने घटनेचे आश्चर्य आणखी वाढले आहे.
सुमारे 50 वर्षांपूर्वी हे पुस्तक तुमच्या ग्रंथसंग्रहालयातून एका मुलीने 1971 मध्ये घेतले होते. ते आता परत करत असल्याचे पत्रात म्हटले आहे. या पुस्तकाची देखभाल आपण चांगल्याप्रकारे केली आहे. हे पुस्तक तुम्हाला मिळाल्यावर याची मी केलेली देखभाल लक्षात येईलच. हे पुस्तक ग्रंथसंग्रहालयात परत करण्यासाठी आपण अनेकदा प्रयत्न केले. पण आता ती संधी आल्याचे तिने पत्रात नमूद केले आहे.आपण आपल्या कामात गुंतल्याने अनेकदा पुस्तक परत पाठवण्याचे राहून गेल्याचे तिने म्हटले आहे.
आपण पुस्तक खूप उशीरा (तब्बल 50 वर्षानंतर) परत करत असल्याने यासोबत 20 डॉलरचा दंडही पाठवत आहोत. या पैशातून तुम्ही आणखी पुस्तके विकत घ्याल, त्याचा इतर सदस्यांना उपयोग होईल. त्यामुळे आपण पुस्तकासोबत दंडही पाठवत असल्याने महिलेने म्हटले आहे. ज्या सदस्यांच्या दंडाची रक्कम 5 डॉलरपेक्षा जास्त असते, अशा सदस्यांचा पुस्तके घेण्याचा अधिकार रद्द करण्यात येतो, असे ग्रथंसंग्रहालयाचे व्यवस्थापक लौरा केलर यांनी सांगितले.
हे पुस्तक परत मिळण्याची आशा आम्ही सोडून दिली होती. तसेच हे पुस्तक आमच्या विस्मृतीत गेले होते. मात्र, या महिलेने 50 वर्षानंतर का होईना ते परत केले आहे. तसेच यावर योग्य तो दंडही भरला आहे. काहीजण ग्रंथसंग्रहालयातून पुस्तके घरी नेतात. मात्र, ती परत करत नाहीत. त्यांच्यासमोर हा आदर्श राहावा, यासाठी हे पुस्तक आणि महिलेने लिहिलेले पत्र संग्रहालयात फलकावर लावणार असल्याचे केलर यांनी सांगितले.
हे पुस्तक परत करत दंडही भरणाऱ्या महिलेने आपली ओळख जाहीर केलेली नाही. याबाबतची माहिती जाहीर झाल्यास समाजातून आपल्याला थट्टेला सामोरे जावे लागेल, त्यामुळे ओळख जाहीर करत नसल्याचे महिलेने म्हटले आहे. मात्र, आम्ही या घटनेकडे वेगळ्या दृष्टीने बघत असल्याचे केलर यांनी सांगितले. या महिलेने उशारा का होईना पण पुस्तक परत करत योग्य तो दंडही दिला आहे. त्यामुळे हा थट्टेचा विषय नसून तो इतर सदस्यांसाठी आदर्श आहे. उशीरा का होईना पण पुस्तक परत करा, असे काही सदस्यांना अनेकदा सांगण्याची वेळ येते, असे केलर म्हणाल्या. तसेच त्यांनी पुस्तकासोबत चांगले पत्रही लिहिले आहे. त्यामुळे ते फलकावर लावणार असल्याचे केलर यांनी सांगितले.


























































