
भारतीय आयुर्विमा महामंडळामध्ये (एलआयसी) सहाय्यक पदांसाठी भरती होणार आहे. त्यासाठी महाराष्ट्रात पूर्व आणि मुख्य परीक्षा इंग्रजी आणि हिंदी भाषेत होणार होती, पण आता हिंदीची जागा मराठी भाषा घेणार आहे. त्याबाबतचे आश्वासन एलआयसीच्या व्यवस्थापनाने भारतीय आयुर्विमा महामंडळ स्थानीय लोकाधिकार समितीला दिले आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील हजारो उमेदवारांना मोठा दिलासा मिळणार आहे.
एलआयसीमध्ये सहाय्यकांची साडेआठ हजार पदे भरण्यात येणार असून त्यापैकी महाराष्ट्रात 1100 पदे आहेत. या पदांसाठी 100 गुणांची पूर्व परीक्षा असून त्यामध्ये सुमारे 40 गुण इंग्रजी किंवा हिंदी भाषेच्या कौशल्यासाठी आहेत, तर 200 गुणांच्या मुख्य परीक्षेत हिंदी भाषेसाठी 40 गुण आहेत. मात्र दक्षिण, पूर्व आणि ईशान्य हिंदुस्थानात हिंदीऐवजी तेथील प्रादेशिक भाषा असणार आहेत. यावरून एलआयसी व्यवस्थापन महाराष्ट्रात हिंदी भाषेतून परीक्षा घेऊन मराठी उमेदवारांना निवडीपासून वंचित ठेवत असल्याचे समोर आले आहे. त्याची गंभीर दखल घेऊन स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाचे अध्यक्ष शिवसेना नेते खासदार गजानन कीर्तिकर, महासंघाचे सरचिटणीस शिवसेना सचिव खासदार अनिल देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय आयुर्विमा महामंडळ स्थानीय लोकाधिकार समितीचे सरचिटणीस गोपाळ शेलार यांनी महाराष्ट्रात हिंदी भाषेऐवजी मराठी भाषेला स्थान देण्याची मागणी व्यवस्थापनाकडे केली होती. त्यानुसार महाराष्ट्रात हिंदी भाषेच्या जागी मराठी भाषा असेल असे आश्वासन व्यवस्थापनाने दिले असल्याची माहिती गोपाळ शेलार यांनी दिली. त्यामुळे राज्यातील एलआयसीची परीक्षा देऊ इच्छिणार्या उमेदवारांची कोंडी फुटणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
21 आणि 22 ऑक्टोबरला होणारी परीक्षा पुढे जाणार
एलआयसीची सहाय्यक पदासाठी पूर्व परीक्षा 21 आणि 22 ऑक्टोबर रोजी होणार आहे. मात्र 21 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुकीसाठी मतदान होत आहे. त्या पार्श्वभूमीवर भारतीय आयुर्विमा महामंडळ स्थानीय लोकाधिकार समितीने पूर्व परीक्षेच्या तारखा पुढे ढकलण्याची मागणी केली होती ती व्यवस्थापनाने मान्य केली असून लवकरच नवीन तारखा जाहीर केल्या जाणार असल्याचे गोपाळ शेलार यांनी सांगितले.

























































