चुलत बहिणीवर बलात्कार करणाऱ्याला जन्मठेप; जालना जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल

976

चुलत बहिणीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला जालना जिल्हा आणि सत्र न्यायालयाने जन्मठेप आणि 10 हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली आहे. जालनाजिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश सुनील वेदपाठक यांनी हा महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. आरोपी सोपान विठ्ठल काजळकर ( वय 22, रा. घोटण, ता. बदनापूर, जि. जालना) याला ही शिक्षा सुनावण्यात आली आहे.

2 फेब्रुवारी 2019 रोजी सायंकाळी 7 ते 8 वाजण्याच्या सुमारास पिडीत मुलगी घरात एकटी असताना शेताशेजारी राहणारा चुलत भाऊ सोपान विठ्ठल काजळकर हा घरात आला. घरात आल्यावर तो दरवाजाची कडी लावत होता. तेव्हा मुलीने कडी लाऊ नकोस, मी माझ्या वडीलांना सांगेन असे म्हणताच सोपानने मुलीला धमकावले आणि बळजबरीने तिच्यावर बलात्कार केला. हा प्रकार मुलीने कुटुंबियांना सांगितला. तसेच सोपान याआधीही शाळेत जात असताना एकटी पाहून अडवत होता, असे सांगितले. याबाबतची तक्रार बदनापूर पोलीस ठाण्यात 6 फेब्रुवारी रोजी देण्यात आली. पोलिसांनी तपास करून न्यायालयात आरोपपत्र सादर केले.

या प्रकरणात सरकार पक्षातर्फे 6 साक्षीदार तपासण्यात आले. यामध्ये पिडीत मुलगी, तिचे वडील, डॉ. स्मिता गावडे, ग्रामसेवक सविता जाधव आणि तपासीक अंमलदार पी.एस. बोलकर हे महत्वाचे साक्षीदार तपासण्यात आले. त्यांच्या साक्षी अत्यंत महत्वाच्या ठरल्या. या प्रकरणात कोर्ट पैरवी कर्मचारी यांची मदत झाली. सरकार पक्षातर्फे वाल्मिक आ.घुगे यांनी बाजु मांडली. त्यांचा युक्तीवाद न्यायालयाने ग्राह्य धरुन आरोपीला जन्मठेपेची आणि 10 हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या