
डायबिटीसच्या नियंत्रणाबाबत दिल्लीच्या एम्स रुग्णालयातील डॉक्टरांनी मोठा दावा केला आहे. डायबिटीस फक्त नियंत्रणात आणता येतो, कायमस्वरुपी घालवता येत नाही. मात्र एम्सच्या डॉक्टरांनी डायबिटीजवर इलाज शोधला आहे. केवळ दोन तासांच्या शस्त्रक्रियेद्वारे डायबिटीस कायमचा बरा होऊ शकतो, असा दावा एम्सच्या शस्त्रक्रिया विभागाचे डॉ. मंजुनाथ यांनी केला आहे.
टीव्ही 9 ने दिलेल्या वृत्तानुसार, आंतरराष्ट्रीय डायबिटीस संघटनेने 2016 मध्ये डायबिटीसवर उपचार म्हणून या शस्त्रक्रियेची शिफारस केली होती, असे डॉ. मंजुनाथ यांनी स्पष्ट केले. शस्त्रक्रियेद्वारे रक्तातील साखरेची पातळी कायमची नियंत्रित करू शकते आणि हा आजार उलटवू शकते असे डायबिटीस संघटनेने सांगितले.
एम्समध्ये डायबिटीसच्या 30 रुग्णांवर ही शस्त्रक्रिया करण्यात आली. शस्त्रक्रियेनंतर या रुग्णांच्या रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात आली असून त्यांना आता औषधांची आवश्यकता नाही. डॉ. मंजुनाथ यांनी दावा केला की, जेव्हा औषधे रोग नियंत्रित करण्यात अयशस्वी होतात तेव्हा शस्त्रक्रिया जीव वाचवू शकते आणि रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करू शकते.
कोणती शस्त्रक्रिया करते डायबिटीज नियंत्रित?
वजन कमी करण्यासाठी करण्यासाठी करण्यात येणाऱ्या बॅरिएट्रिक शस्त्रक्रियेसारखीच ही शस्त्रक्रिया असते. वैद्यकीय भाषेत याला मेटाबॉलिक सर्जरी म्हणतात. ही शस्त्रक्रियेद्वारे पचनसंस्थेचा मार्ग बदलण्यात येतो. यामुळे अन्न तोंडातून अन्ननलिकेकडे आणि नंतर पोटात जाते. पोटानंतर अन्न ड्युओडेनममध्ये (पहिल्या आतड्यात) प्रवेश न करता थेट लहान आतड्यात जाते. यामुळे डायबिटीसच्या रुग्णांमध्ये इन्सुलिन संवेदनशीलता त्वरित वाढते. स्वादुपिंड आवश्यकतेनुसार इन्सुलिन तयार करण्यास सुरुवात करतो. साखरेची पातळी एक किंवा दोन दिवसात सामान्य होते.
शस्त्रक्रियेमुळे साखरेची पातळी सामान्य झाली आणि डायबिटीस पूर्ण बरा झाला असा दावाही डॉ. नाथ यांनी केला आहे. शस्त्रक्रियेनंतर चांगली जीवनशैली आणि आहार याचे संतुलन राखल्यास वर्षानुवर्षे साखरेची पातळी नियंत्रित ठेवत डायबिटीस रोखता येतो.
दरम्यान, डॉ. मंजू नाथ यांनी स्पष्ट केले की ही शस्त्रक्रिया फक्त टाइप 2 डायबिटीससाठी प्रभावी आहे. टाइप 1 किंवा अनुवांशिक डायबिटीस असलेल्यांसाठी हे विशेषतः प्रभावी नाही.



























































