क्रिकेटच्या पंढरीत फुटबॉलनायक अवतरला, वानखेडेवर हिंदुस्थानच्या फुटबॉल आशेला मेस्सीरूपी प्रेरणा

सर्व छायाचित्रे- संदीप पागडे, रुपेश जाधव

आज   क्रिकेटच्या  पंढरीत  कडेकोट बंदोबस्तात फुटबॉलचा महानायक लिओनल मेस्सी अवतरला. अत्यंत उत्साही आणि जल्लोषपूर्ण वातावरणात मुंबईकर फुटबॉलप्रेमींनी आपल्या शिस्त आणि क्रीडाप्रेमाचे तेजस्वी दर्शन घडवत फुटबॉलचा सार्वकालीन महान खेळाडू (गोट) मेस्सीचे याचि देही याचि डोळा दर्शन घेतले. नेहमीच क्रिकेटपटूंच्या घोषणांनी दुमदुमणारे वानखेडे स्टेडियम आज ‘मेस्सी मेस्सी’च्या घोषणांनी दणाणले. तो जोश-जल्लोष पाहून क्रिकेटच्या पंढरीत खचलेल्या हिंदुस्थानी फुटबॉलसाठी आशा, स्वप्न आणि प्रेरणा घेऊन मेस्सी आल्याचा भास सर्वांना झाला.

काल कोलकात्यातील कार्यक्रमाला अतिउत्साहामुळे लागलेल्या गालबोटानंतर मुंबईत शिस्त, संयम आणि संस्कृतीचा विजय झाल्याचे दिसून आले. मुंबई पोलिसांनी सुरक्षा व्यवस्थेचे शिवधनुष्य समर्थपणे पेलले आणि मुंबईकरांनी दाखवून दिलं की, आम्ही केवळ चाहतेच नाही, तर जबाबदार क्रीडाप्रेमीही आहोत.

2007, 2011, 2024 अशा जगज्जेतेपदांच्या आठवणींनी पावन झालेले वानखेडे स्टेडियम पुन्हा एकदा इतिहासाचे साक्षीदार ठरले. आज वानखेडेवर विजयाचा चषक उंचावला गेला नाही, पण हिंदुस्थानी
फुटबॉलच्या स्वप्नांचा चेंडू हवेत झेलला गेला. ‘प्रोजेक्ट महादेवा’ अंतर्गत निवडलेल्या मुला-मुलींना मेस्सीने दिलेले फुटबॉलचे धडे केवळ तांत्रिक नव्हते. ते धडे होते संघर्षाचे, संयमाचे आणि विश्वासाचे. त्या लहान पायांत आज केवळ फुटबॉल नव्हता, तर उद्याच्या हिंदुस्थानी फुटबॉलचे भविष्य धावत होते. आज या कार्यक्रमात इंडियन स्टार्स आणि मित्रा स्टार्स यांच्यात प्रदर्शनीय फुटबॉल सामना खेळविण्यात आला.  हिंदुस्थानचा स्टार सुनील छेत्री या लढतीत खेळला. तेव्हा वानखेडेवर ‘छेत्री… छेत्री…’चा नादही घुमला.

आपल्या एका झलकसाठी आलेल्या हजारो चाहत्यांना मेस्सीने अभिवादन केले आणि ऑटोग्राफ असलेले
फुटबॉल स्टॅण्डमध्ये किक करताना जणू तो म्हणत होता, हा खेळ तुमचाही आहे. फक्त स्वप्न पाहायला शिका. त्याच्या उपस्थितीने हिंदुस्थानी फुटबॉलमध्ये नवचैतन्य संचारावे अशी माफक अपेक्षा आहे.

मेस्सी, तुस्सी ग्रेट हो!

फुटबॉलमध्ये मेस्सीमहिमा काय आहे याचे दर्शन अवघ्या  हिंदुस्थानला झाले. हिंदुस्थानात असलेल्या इंडियन सुपर लीगच्या सामन्यांची तिकिटे 100 रुपये असूनही हिंदुस्थानी फुटबॉलप्रेमी मैदानात फिरकत नाहीत. मात्र मेस्सीची एक झलक पाहण्यासाठी महाराष्ट्रच नव्हे, तर देशाच्या कानाकोपऱयातून शेकडो फुटबॉलवेडे वानखेडेवर पोहोचले होते. तेसुद्धा मेस्सीच्या एका झलकसाठी. मेस्सीच्या या गोट टूरमुळे हिंदुस्थानी फुटबॉलला किती फायदा होईल ते काळच सांगेल, पण गोट टूर आयोजकांचे मात्र खिसे भरले आहेत.

मुख्यमंत्र्यांच्या भाषणाला मेस्सी मेस्सी

मेस्सीमय झालेल्या वानखेडेवर जमलेले 35 हजार फुटबॉलप्रेमी फक्त आणि फक्त मेस्सीला पाहायला आले होते. या कार्यक्रमात प्रोजेक्ट महादेवाविषयी सांगायला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माईक हातात घेताच चाहत्यांनी बू करून त्यांची हुर्यो उडवली. मग ‘गणपती बाप्पा मोरया’चा जयघोष करत चाहत्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी मेस्सी… मेस्सी…चा जयघोष सुरू केला. याचाच अर्थ कुणालाही मुख्यमंत्र्याच्या भाषणात रस नव्हता.

मुंबई पोलिसांना सलाम!

कार्यक्रमाची सुरक्षा व्यवस्था कशी असावी आणि गर्दीचे नियोजन कसे करावे याची धडे मुंबई पोलिसांनी पुन्हा एकदा सर्वांना दिले. मेस्सीचे दर्शन घेण्यासाठी सकाळपासून फुटबॉलवेडय़ांचे जथे मुंबई लोकलमधून वानखेडेवर धडकत होते. सर्व सुरळीत पार पाडावे म्हणून मुंबई पोलिसांनी आपले सर्व कसब पणाला लावत चाहत्यांना योग्य मार्गदर्शन केले आणि चाहत्यांनीही आपल्या शिस्तीचे दर्शन घडवत मुंबई पोलिसांना सहकार्य केले. आज मेस्सी… मेस्सी नव्हे, तर ‘मुंबई पोलीस… मुंबई पोलीस…’ असाही आवाज घुमला.

चैन पडेना आम्हाला

मुंबईत मेस्सीची पावले प्रथमच पडणार होती. त्या पावलांचा महिमा पाहण्यासाठी चाहते दुपारीच चर्चगेट स्टेशन परिसरात पोहोचले आणि त्यांनी मेस्सीच्या पोस्टरसह रॅली काढत उत्साह वाढवला. वुई लव्ह मेस्सी… वुई लव्ह मेस्सीचा घोष त्यांनी केला, पण या रॅलीत ‘ही शान कुणाची’ आणि ‘मेस्सी आला मुंबईला, चैन पडेना आम्हाला’ असा केलेला बॅनर सर्वांचे लक्ष वेधत होता.

गोटभेटला गॉडला

फुटबॉलचा गोट अर्थात महान फुटबॉलपटू लिओनल मेस्सी आपल्या या संस्मरणीय दौऱयात ऐतिहासिक वानखेडेवर क्रिकेटचा गॉड म्हणजेच देव सचिन तेंडुलकरला भेटला. दोघांची भेट म्हणजे गोट भेटला गॉडला अशीच होती. या भेटीत सचिनने मेस्सीला आपली स्वाक्षरी असलेली टीम इंडियाची जर्सी भेट दिली, तर मेस्सीने आपले फुटबॉल सचिनला दिले. या भेटीत दोघांनी एकमेकांना आलिंगन दिले आणि त्यानंतर सचिनने मेस्सी, सुआरेझ आणि रॉड्रिगो या तिघांचे मनापासून आभार मानले. तो म्हणाला, आपण मुंबईत आहोत आणि तुम्ही लिओ, लुईस आणि रॉड्रिगो यांचे ज्या पद्धतीने स्वागत केले ते अविस्मरणीय आहे.  मुंबई हे स्वप्नांचे शहर असून वानखेडे मैदानावर असंख्य स्वप्ने साकार होताना आपण पाहिली आहेत. 2011 मधील एकदिवसीय विश्वचषकाचा सुवर्णक्षणही याच मैदानावर मुंबईकरांच्या पाठिंब्यामुळे शक्य झाला, असे सचिन यांनी सांगितले.