
सामना प्रतिनिधी । नांदेड
नांदेड-अर्धापूर रस्त्यावरील दारूने भरलेला टेम्पो लुटणाऱ्या आठ जणांपैकी चार जणांना स्थानिक गुन्हा शाखा पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना २१ सप्टेंबर रोजी घडली होती. या प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हा शाखेकडे सोपविण्यात आला होता.
नांदेड जिल्ह्याच्या धर्माबाद येथील पायोनिअर या दारूच्या कंपनीमधून २१ सप्टेंबर २०१८ रोजी एका आयसर टेंपो क्र. एमएच-०४-एफपी-४०९६ यामध्ये विदेशी दारूचे ४०५ बॉक्स भरले होते. या दारूची एकूण किंमत २१ लाख ४३ हजार होती. ही गाडी संभाजीनगरकडे जाणार होती. रात्री दिडच्या सुमारास गाडी नांदेड-अर्धापूर रस्त्यावर पोहचली तेंव्हा त्या गाडीमागे एक बोलेरो गाडी येत होती. त्या गाडीत आठ जण होते. त्यांनी आयशर टेंपो अडविला. टेंपोचा चालक आणि क्लिनरला मारहाण करुन त्यांना आपल्या गाडीत बसवून पळवून नेले. नेताना त्यांच्या डोळ्यावर काळीपट्टी सुध्दा बांधली. त्यानंतर आयशरचा चालक आणि क्लिनरला मालेगावजवळ खाली उतरवून चोरटे विदेशी दारूने भरलेला आयशर टेंपो घेवून पळून गेले.
नांदेडच्या स्थानिक गुन्हा शाखेने विविध तपास यंत्रणांच्या माध्यमातून शोध सुरु केला आणि कंधार येथील शंकर उर्फ बाळू संभाजी मुंढे आणि त्याचा साथीदारांनी आयशर गाडी पळविल्याची माहिती प्राप्त झाली. यावरुन पोलीस अधीक्षक संजय जाधव, अपर पोलीस अधीक्षक डॉ.अक्षय शिंदे यांनी दिलेल्या आदेशानुसार स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक सुनील निकाळजे, सहायक पोलीस निरीक्षक पांडूरंग भारती यांनी ३ ऑक्टोबर २०१८ रोजी शंकर उर्फ बाळू संभाजी मुंढे (२७) रा.कुणकी ता. किनवट सध्या कंधार, गोविंद नीळकंठ पवार (२७) रा.पार्डी ता. लोहा, प्रदीप उर्फ जित्तू गोविंद मुसळे (२२) रा.लोहा, राजू राम हंकारे (२०) रा.पार्डी ता. लोहा या चार जणांना पकडले. यावेळी पोलिसांनी २१ लाख रुपये किंमतीचे वेगवेगळे दारूचे बॉक्स आणि पांढऱ्या रंगाची एक बोलेरो गाडी असा २६ लाख ५१ हजार रुपयांचा चोरीतील ऐवज जप्त केला आहे.
सर्व पोलीस पथकाचे पोलीस अधीक्षक संजय जाधव आणि अपर पोलीस अधीक्षक डॉ.अक्षय शिंदे यांनी कौतूक केले आहे.





























































