
तब्बल 45 दिवसांनंतर महाराष्ट्रासह देशभरात दारूची दुकाने सुरू झाल्यानंतर तळीरामांची दुकानांवर अक्षरश: झुंबड उडाली. रांगेच्या नावाखाली प्रचंड ‘चढाओढ’, गोंधळ उडाल्याने सोशल डिस्टंसिंगचा फज्जा उडाला. त्यामुळे पोलिसांना सौम्य लाठीचार्जही करावा लागला. अनेक ठिकाणी गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी लावलेले बॅरिकेड्स तळीरामांनी तोडले. हिंदुस्थानमधील तळीरामांच्या या ‘झिंगे’मुळे जगात मात्र देशाची बदनामी झाली.
हे वाचलेत का ? – तळीराम शब्द आला कुठून?
कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 24मार्च रोजी 21दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला. यानंतर पुन्हा दोन वेळा लॉकडाऊन वाढवण्यात आल्यामुळे 17 मेपर्यंत लॉकडाऊन राहणार आहे. मात्र अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी देशात 4 मेपासून वाईन शॉप सुरू करण्यास परवानगी देण्यात आली. मात्र ही परवानगी देताना कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी सोशल डिस्टंन्स पाळणे अनिवार्य करण्यात आले होते. मात्र दारूविना ‘तडफडणा’र्या तळीरामांनी सरकारच्या मार्गदर्शक सूचनांचा फज्जा उडवला. निर्णय जाहीर झाल्यानंतर दुकाने उघडण्याआधी पहाटेपासूनच अनेक किलोमीटरच्या रांगा लावल्या. दारूची ओढ इतकी प्रचंड होती की अनेक जण उन्हात तासनतास उभे होते. यामुळे सोशल मीडियातूनही बेवड्यांची चांगलीच उतरवण्यात आली. दरम्यान, मुंबईत दारू घेण्यासाठी दोन दिवस झालेल्या प्रचंड गर्दीमुळे कोरोनाचा धोका वाढत असल्याचे सांगत पालिकेने दारूविक्रीवर तातडीने बंदी घातली आहे.
हे वाचलेत का ? – रत्नागिरीतील घरपोच दारू विक्रीचा आदेश मागे घेतला
दारूड्यांचा आटापिटा पाहून परदेशी हैराण
देशात दारूची दुकाने सुरू झाल्यानंतर वाईन शॉपबाहेर लागलेल्या रांगांचे लाइव्ह प्रक्षेपण अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय चॅनेलवर सुरू झाले. या ठिकाणी पहिल्या ग्राहकाचे फुलांचा हार घालून होणार्या स्वागतापासून दारू घेण्यासाठी होणारी झटापट, पोलिसांची तारांबळ, लाठीचार्ज आणि दारू घेतल्यानंतर दाखवलेला प्रचंड आनंद-उत्साह पाहून परदेशातील नागरिकही चांगलेच हैराण झाले. हिंदुस्थानमधील तळीरामांचा ‘उत्साह’ पाहून जगभरात जोरदार चर्चा सुरू आहे. त्यामुळे देशाची बदनामी होत आहे.
हे वाचलेत का ? – रांगा लावून दारू घेता, मात्र मुलांची फी भरण्यासाठी पैसे नाहीत? शाळेच्या मुख्याध्यापकांचा बेवड्यांना खणखणीत सवाल
हिंदुस्थानात असे दृश्य कधीही पाहिले नाही!
सुमारे 70 वर्षांपूर्वी दारूची दुकाने ही वस्तीपासून दूर असायची. मात्र आता अनेक शहर-गावांत टप्प्याटप्प्यावर दारूची दुकाने दिसतात. देशात छुप्या पद्धतीने दारू पिणार्यांचे प्रमाण सर्वाधिक आहे. मात्र लॉकडाऊनमध्येच अचानक संधी मिळाल्यामुळेच अशा रांगा लागल्याचे बोलले जात आहे. युरोप, अमेरिकासारख्या देशात दारू पिण्यात कोणतीही लपवाछपवी केली जात नाही. मात्र या दृश्यांमुळे देशात दारू पिणार्यांची संख्या किती मोठी आहे हे स्पष्ट झाले. हिंदुस्थानात असे दृश्य कधीही पाहिले नाही, अशी प्रतिक्रियाही परदेशी नागरिकांकडून व्यक्त होत आहे.



























































