मराठवाडय़ाचा वाङ्मयीन दस्तऐवज

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>>केदार काळवणे

मराठी साहित्यात प्रा. प्रल्हाद जी. लुलेकर यांची परिवर्तनवादी आणि साहित्याचा समाजशास्रीय अन्वेषण दृष्टीने अभ्यास करणारे अभ्यासक म्हणून ओळख आहे. लेखक-विचारवंत-वक्ते म्हणूनही ते महाराष्ट्राला परिचित आहेत. शोषित-वंचितांच्या समकालीन वास्तवाच्या साहित्यातून झालेल्या आविष्काराचा अन्वयार्थ त्यांनी संशोधन-समीक्षेतून लावला आहे. त्यांचे वैचारिक चिंतन मराठी विचार विश्वात मोलाचे ठरलेले आहे. गावगाडा आणि अलुतेदार-बलुतेदार, साठोत्तरी साहित्यप्रवाह, महात्मा जोतीराव फुले आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर तसेच मराठवाडा आणि मराठवाडय़ातील साहित्य हे विषय प्रा. लुलेकरांच्या चिंतन-अभ्यासाचे विषय राहिलेले आहेत. त्यांनी नुकताच ‘मराठवाडय़ातील मराठी वाङ्मयाचा इतिहास’ हा ऐतिहासिक ग्रंथ सिद्ध केला आहे. जवळपास 500 पृष्ठांच्या या ग्रंथातून त्यांनी मराठवाडय़ातील मराठी वाङ्मयाच्या इतिहासाचा लेखाजोखा मांडलेला आहे.

मराठवाडा हा प्रदेश प्राचीन काळापासून सांस्कृतिकदृष्टय़ा समृद्ध प्रदेश आहे. मध्ययुगीन काळापासून झालेली वाङ्मयीन निर्मिती या प्रदेशातील सांस्कृतिक-सामाजिक विश्वाला संपन्न करणारी आहे.

असे असले तरी मराठवाडय़ातील मराठी वाङ्मयाचा समग्र इतिहास आजपर्यंत सिद्ध झालेला नाही. प्रस्तुत ग्रंथाच्या रूपाने तो प्रथमच ग्रंथीत होतो आहे. म्हणूनच या ग्रंथाचे महत्त्व लक्षात घेणे आवश्यक ठरते. प्रारंभापासून ते आजपर्यंतच्या वाङ्मयाच्या इतिहासाची सामाजिक-सांस्कृतिक पार्श्वभूमीसह मांडणी या ग्रंथातून झालेली आहे. गेल्या आठशे वर्षांतील सर्व वाङ्मय प्रकार, विविध प्रवाह आणि जवळपास दीड हजार साहित्यिकांच्या नोंदी या ग्रंथातून झालेल्या आहेत. कोणताही वाङ्मयेतिहास हा तटस्थ वृत्तीने लिहिला गेला आणि त्या-त्या काळातील वैविध्यपूर्ण वाङ्मयीन आवाजांना सामावून घेणारा असला तरच तो वैशिष्टय़पूर्ण ठरत असतो. यादृष्टीनेही हा ग्रंथ मोलाचा वाटतो. मराठवाडय़ातील वाङ्मयाच्या दीर्घपटाला कवेत घेत त्याची ऐतिहासिकता विशद करणारा हा ग्रंथ मराठवाडय़ातील वाङ्मयाचा मोलाचा दस्तऐवज आहे. समकालीन सामाजिक स्थित्यंतरे आणि साहित्य यांच्या अनुबंध तपासात वाङ्मयेतिहासाची मांडणी प्रा. लुलेकरांनी केलेली आहे. त्यामुळेही हा ग्रंथ वैशिष्टय़पूर्ण ठरला आहे.

मराठवाडय़ातील मराठी वाङ्मयाच्या इतिहासाची मांडणी त्यांनी आठ प्रकरणांतून केलेली आहे. प्रत्येक प्रदेशाच्या साहित्य व्यवहाराला तेथील भूगोल आणि इतिहास आकार देत असतो. त्या प्रदेशाच्या सांस्कृतिक घडणीला तेथील भूगोल आणि इतिहासच कारणीभूत ठरत असतो. अशा भूगोल आणि इतिहासाच्या परिणामातून आकारलेल्या वैशिष्टय़पूर्ण संस्कृतीचे दाब समकालीन साहित्यावर पडत असतात. याचे सजग भान ठेवून प्रा.लुलेकरांनी या ग्रंथाच्या आरंभीच्या ‘मराठवाडाः भूगोल आणि इतिहास’ व ‘मराठवाडा ः साहित्य आणि संस्कृती’ या दोन प्रकरणांतून विस्ताराने मांडणी केली आहे. या मांडणीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी ‘मध्ययुगीन साहित्य’, ‘आधुनिक साहित्य’, ‘साठोत्तरी साहित्य’, ‘साठोत्तरी साहित्य प्रवाह’, ‘साठोत्तरी साहित्यः अन्य साहित्य प्रकार’ आणि ‘साहित्य समीक्षा’ या पुढील सहा प्रकरणांमधून मराठवाडय़ातील मराठी वाङ्मयाचा इतिहास नोंदवला आहे. शेवटी परिशिष्टात मराठवाडय़ातील साहित्य संमेलने व अध्यक्ष यांची यादी दिलेली आहे. त्यासोबतच निवडक संदर्भ ग्रंथ सूचीही जोडलेली आहे. एकंदरीत सामाजिक-सांस्कृतिक पार्श्वभूमीसह मराठवाडय़ातील मराठी वाङ्मयाचा संपूर्ण साहित्य व्यवहार वाचक-अभ्यासकांना समजून घेता यावा या प्रकारची ग्रंथरचना प्रस्तुत लेखकाने केलेली आहे. वाङ्मय अभ्यासकांना संदर्भ ग्रंथ म्हणून हा ग्रंथ उपयुक्त ठरणारा आहे.

इतिहास लेखनात इतिहासकाराच्या भूमिकेलाही फार महत्त्व असते. त्याच्या भूमिकेचे पडसाद इतिहास लेखनावर पडण्याची दाट शक्यता असते. ती भूमिका जर सर्वसमावेशक नसेल तर इतिहास एकसुरी होण्याचा धोका असतो. इतिहासकाराची भूमिका जर पक्षपाती असेल, तर इतिहासाची एकच बाजू समाजासमोर येते आणि तो इतिहास एकांगी बनतो. सदर ग्रंथातील वाङ्मयेतिहासाचे प्रमुख वैशिष्टय़ हेच आहे की, हा इतिहास सर्वसमावेशक आणि सर्व वाङ्मधारांना सामावून घेणारा असा आहे. मराठवाडय़ातील मराठी वाङ्मयाला योगदान देणाऱया साहित्याच्या त्याच्या गुणदोषांसकट नोंदी करणे ही भूमिका या ग्रंथाची असल्यानेच हा ग्रंथ लक्षणीय ठरतो. वाङ्मयाची पार्श्वभूमी मांडतानाही ही सर्वसमावेशकता दिसते. हैदराबाद मुक्तिसंग्राम, विकास आंदोलने यांचा जसा निर्देश ते करतात तसाच दलितांचा मुक्ती संग्रामातील सहभाग यांचीही ते नोंद घेतात. संतसाहित्यासोबतच वीरशैव, सुफी व मुस्लिम साहित्याचीही ते दखल घेतात. इतिहास लेखन ही गुंतागुंतीची प्रक्रिया आणि जोखमीची गोष्ट आहे. एकाच वेळी लेखकांची स्थान निश्चिती, त्याची समीक्षा आणि सर्व प्रकारच्या आविष्कारांची व्यवस्था वाङ्मयेतिहासकाराला लावावी लागते. अशावेळी त्याची भूमिका व्यापक असणे आवश्यक असते. ती व्यापक असली तरच तो इतिहास मौलिक ठरतो. या ग्रंथातील इतिहास लेखनात या व्यापक भूमिकेचा प्रत्यय येतो.

प्रा.लुलेकरांचा मराठवाडा आणि मराठवाडय़ातील साहित्य हा आयुष्यभराचा चिंतन-अभ्यासाचा विषय राहिलेला आहे. या चिंतन-अभ्यासातून आलेली निराळी निरीक्षणे या ग्रंथातून प्रकटलेली आहेत. त्यांच्या आयुष्यभराच्या मराठवाडाविषयक अभ्यासाचे सार या लेखनातून व्यक्त झाल्याने हा ग्रंथ मूल्यवान झालेला आहे. मराठवाडय़ातील मराठी वाङ्मयाच्या समग्र इतिहास लेखनाचे प्रयत्न यापूर्वी फारसे झालेले दिसत नाही. एखादा वाङ्मय प्रकार किंवा प्रवाह, विशिष्ट कालखंड अशा अनुषंगाने काही पुस्तके व संपादने प्रसिद्ध आहेत. समग्र इतिहास एकत्रितपणे प्रथमच या ग्रंथाच्या रूपाने प्रसिद्ध होतो आहे. म्हणून या ग्रंथाला ऐतिहासिक महत्त्व आहे. सांस्कृतिक व्यवहारात वाङ्मयेतिहास ग्रंथाला नेहमीच महत्त्व असते. त्यातून आपल्या पूर्वपरंपरेला समजून घेता घेता वर्तमानाची दिशाही निश्चित करता येते. अशी क्षमता सदर ग्रंथात आहे. हा ग्रंथ म्हणजे मराठवाडय़ातील मराठी वाङ्मयाच्या इतिहासाची बखर आहे. ही बखर लेखक-कवी-अभ्यासकांना मराठवाडय़ाच्या ऐतिहासिक साहित्य संचिताची ओळख करून देणारी आणि मराठवाडय़ाच्या सांस्कृतिक वेगळेपणाची जाणीव करून देणारी आहे. त्यासोबतच साहित्याच्या नव्या अभ्यासकांना संशोधनाचे अनेकविध नवे विषय पुरवणारी आहे.

मराठवाडय़ातील मराठी वाङ्मयाचा इतिहास
लेखक – प्रा. प्रल्हाद जी. लुलेकर
प्रकाशक – कैलास पब्लिकेशन