Video – लाईव्ह शोमध्ये दिली 2 खुनांची कबुली, आरोपीला स्टुडियोतून अटक

1025

पंजाबमधील चंदीगडमध्ये एका युवतीचा खून झाला होता. या खुनाप्रकरणी एका व्यक्तीला खासगी वृत्तवाहिनीच्या स्टुडियोमधून अटक करण्यात आली आहे. या व्यक्तीने हा खून आपणच केला असल्याची कबुली दिली, सोबतच आपण यापूर्वीही एक खून केला असल्याचेही त्याने मान्य केले. पोलिसांनी ही कबुली ऐकल्यानंतर आरोपीला स्टुडियोमधूनच अटक केली. खुनाच्या कबुलीपासून अटकेपर्यंतचा हा सगळा प्रकार कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे.

मनिंदर सिंग असं आरोपीचं नाव असून त्याने सरबजीत कौर नावाच्या तरूणीची हत्या केल्याचं कबूल केलं आहे. सरबजीत हिचा मृतदेह चंदीगड औद्योगिक वसाहतीमधील स्काय हॉटेलमध्ये सापडला होता. हॉटेलच्या 301 क्रमांकाच्या खोलीमध्ये सरबजीतचा गळा चिरून हत्या करण्यात आली होती. हॉटेलमध्ये काम करणाऱ्यांकडे पोलिसांनी चौकशी केली असता त्यांना कळाले की 30 डिसेंबर 2019 रोजी मनिंदरने ही खोली बुक केली होती. 1 जानेवारीला मनिंदर आणि सरबजीत हे खोली रिकामी करणार होते. बराच वेळ झाला तरी खोली रिकामी करण्यासाठी कोणीच येत नाही हे पाहून हॉटेल कर्मचाऱ्यांनी आधी बराच वेळ दरवाजा ठोठावला आणि नंतर त्यांच्याकडच्या चावीने दरवाजा उघडला. यावेळी त्यांना सरबजीतचा मृतदेह दिसून आला. पोलिसांनी सीसीटीव्ही पाहिलं असता त्यांना मनिंदर सिंग हा 30 डिसेंबर 2019 रोजी रात्री 11.56 वाजता हॉटेलमधून बाहेर पडताना दिसला होता.

मनिंदर सिंगने 2010 साली प्रेयसीचा खून केला होता. या प्रकरणी त्याला जन्मठेपेची शिक्षाही सुनावली आहे. 5 वर्ष शिक्षा भोगल्यानंतर त्याला जामीन मिळाला होता. मनिंदरचं एका खासगी रुग्णालयात नर्स म्हणून काम करणाऱ्या सरबजितवर प्रेम जडलं होतं आणि दोघांनी लग्न करायचं ठरवलं होतं. सरबजितच्या घरच्यांचा या लग्नाला विरोध केला होता. मनिंदरला काही काळानंतर सरबजितचे दुसऱ्या कोणासोबत प्रेमसंबंध असल्याचा संशय यायला लागला होता. या दोन कारणांमुळे त्याने सरबजितचा खून करायचं ठरवलं होतं.

आपली प्रतिक्रिया द्या