
सामना प्रतिनिधी । परळी वैजनाथ
ऐन सणासुदीच्या तोंडावर भारनियमनामुळे जनता त्रस्त झाली आहे. या प्रश्नी आता जनतेमध्ये मोठा असंतोष आहे. याबाबत विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने व्यापक जन आंदोलन उभे करणार असल्याचा इशारा माजी नगराध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांनी दिला आहे.
माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्रात भारनियमनमुक्ती करून दाखवली होती. भारनियमन मुक्तीचा हा वारसा या सरकारने ना चालवला ना टिकवला. आता ग्रामीण भाग आणि महानगरेही अंधारात आहेत. लोड शेडिंगमुळे त्रस्त जनतेचा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेस याप्रश्नी तीव्र आंदोलन करणार आहे. सरकारच्या चुकीच्या नियोजनामुळे राज्य अंधारात आहे. भार नियमनमुक्त महाराष्ट्र करण्याच्या पोकळ घोषणा करणार्या सरकारला जाब विचारावाच लागेल, असे धर्माधिकारी म्हणाले.
परळी शहरावर अन्यायकारक व चुकीच्या पद्धतीने भारनियमन लादल्यानंतर महावितरणने वीज निर्मीती करणाऱ्या परळी शहराला धक्का देण्याचा तुघलकी निर्णय घेतला आहे. इमरजन्सी या गोंडस नावाखाली भारनियमन हा नवा प्रकार लागू करण्यात आला असून याअंतर्गत शहराचा वीज पुरवठा कोणत्याही क्षणी बंद करणे, कोणत्याही क्षणी चालू करणे असा नियम करण्यात आला आहे. आघाडी सरकारने वीजनिर्मिती केंद्र असलेले शहरे भारनियमन मुक्त ठेवण्याचा निर्णय झालेला होता. त्यानंतर आत्तापर्यंत हा नियम पाळण्यात येत होता. आता मात्र या सरकारच्या काळात वीजनिर्मिती केंद्र असणाऱ्या परळीलाही ‘इमर्जन्सीचा’ फटका बसत आहे. या मुळे परळीकरात याबाबत प्रचंड रोष निर्माण झाला आहे. अन्यायकारक व चुकीचे भारनियमन त्वरित बंद करावे अन्यथा परळीत व्यापक जनआंदोलन उभे करणार असल्याचा इशारा बाजीराव धर्माधिकारी यांनी दिला आहे.





























































