साखर कारखान्यांच्या कर्जाला राज्य बँकेची कात्री, मागील वर्षीच्या तुलनेत अर्धेच माल तारण कर्जवाटप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधीक फोटो

राज्यातील पूरस्थितीची मोठी किंमत साखर कारखान्यांना मोजावी लागत आहे. गाळपासाठी पुरेसा ऊस उपलब्ध नसल्याने साखरेचे उत्पादन निम्म्यावर आले आहे. त्यामुळे साखर कारखान्यांसाठी खरा आधार असलेल्या महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेनेही माल तारण कर्जपुरवठा करताना आपला हात आखडता घेत केवळ 694 कोटी रुपये एवढय़ा कमी माल तारण कर्जाचे वाटप केले आहे. 2018-19 च्या ऊस गाळप हंगामात बँकने 53 कारखान्यांना तब्बल साडेतेराशे कोटी रुपयांचे कर्जवाटप केले होते.

राज्यात अडीचशेहून अधिक सहकारी आणि खासगी साखर कारखाने आहेत, मात्र पुरेसा ऊस उपलब्ध नसल्याने चालू गाळप हंगामात केवळ 145 साखर कारखाने सुरू झाले होते. त्यापैकी तीन-चार कारखाने उसाअभावी बंद झाले आहेत. तसेच मागील वर्षी ऊस गाळप हंगाम सुरू झाल्यानंतर पहिल्या तीन महिन्यांत सुमारे 70 लाख मेट्रिक टन साखरेचे उत्पादन झाले होते, मात्र यंदा हा आकडा निम्म्यावर म्हणजे 35 लाख मेट्रिक टनावर अडखळला आहे. साखर कारखान्यांना उसाचे पैसे शेतकऱयांना वेळेत देता यावेत म्हणून कारखान्यांनी उत्पादित केलेल्या साखरेच्या किमतीच्या सुमारे 90 टक्के रक्कम माल तारण कर्ज म्हणून दिली जाते. त्या पार्श्वभूमीवर 41 साखर कारखान्यांनी माल तारण कर्जाची राज्य सहकारी बँकेकडे मागणी केली होती. त्यापैकी 39 कारखान्यांना माल तारण कर्ज दिले आहे. मात्र यंदा मागील वर्षीच्या तुलनेत साखरेचे उत्पादन घटलेले असल्याने आतापर्यंत 694 कोटी रुपयांचे कर्जवाटप केले आहे. माल तारण कर्जाच्या घटलेल्या आकडय़ाबाबत राज्य बँकेकडे विचारणा केली असता कारखाने जेवढय़ा साखरेचे उत्पादन करतात त्याआधारेच तारण कर्ज दिले जाते. यंदा उत्पादन कमालीचे घटल्याने माल तारण कर्जाचा आकडाही मागील वर्षीच्या तुलनेत घटला असल्याचे स्पष्ट केले आहे.