लोकल विस्कळीत; प्रवाशांचे हाल, मस्जिद स्थानकात रूळ पाण्याखाली; सीएसएमटी ते वडाळा पूर्णपणे ठप्प

मुंबईकरांची ‘लाईफलाईन’ असलेल्या लोकलच्या तिन्ही रेल्वे मार्गांवरील वाहतुकीचा बोजवारा उडाला. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथील यार्डमध्ये पाणी भरल्याने मध्य रेल्वे खोळंबली, तर हार्बरवर मस्जिद स्थानकात रूळ पाण्याखाली गेले. त्यामुळे सीएसएमटी ते वडाळा रोड लोकल सेवा तासभर पूर्णपणे ठप्प झाली. पश्चिम रेल्वेवरही ठिकठिकाणी पाणी साचल्याने लोकल वाहतूक कोलमडली.

मान्सूनच्या पहिल्याच हजेरीने तिन्ही रेल्वे मार्गांवरील लोकल सेवेची दाणादाण उडवून दिली. सीएसएमटी येथील यार्डमध्ये पाणी भरल्याने लोकल सेवा कोलमडली. फलाट क्रमांक 5, 6, 7 व 10 ते 18वरील लोकल तसेच लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकावर पावसाचा मोठा परिणाम झाला. फलाट क्रमांक 3 येथे पाणी साचल्याने मेन लाईनवरून ठाणे, बदलापूर, टिटवाळा, कसाराच्या दिशेने जाणाऱ्या लोकल वाहतुकीला जवळपास पाऊण ते एक तासाचा विलंब झाला.

सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास सीएसएमटीबरोबरच भायखळा, दादर, माटुंगा, कुर्ला, घाटकोपर, डोंबिवली, कल्याण, बदलापूर आदी स्थानकांत पाणी साचले. अनेक स्थानकांत रूळ दिसेनासे झाल्याने लोकल गाड्या अत्यंत धिम्या गतीने चालवण्यात आल्या. त्याचा संपूर्ण वाहतुकीवर परिणाम झाला. अनेक लोकल ठिकठिकाणी थांबवण्यात आल्या होत्या. भांडूप, कुर्ला, घाटकोपर, रे रोड दरम्यान लोकलच्या रांगा लागल्या होत्या. त्यामुळे पीक अवर्सला कार्यालय गाठण्याच्या घाईत असलेल्या नोकरदारांची प्रचंड रखडपट्टी झाली.

22 लोकल फेऱ्यांची दादरपर्यंतच धाव

रुळांवर जागोजागी पाणी साचल्यामुळे रेल्वे प्रशासनाला अनेक लोकल फेऱ्यांचा प्रवास अर्ध्यावर रद्द करावा लागला. याचा अप मार्गावरील लोकलच्या वाहतुकीवर विशेष परिणाम झाला. दुपारी 2 वाजेपर्यंत सीएसएमटीच्या दिशेने येणाऱ्या तब्बल 22 लोकल फेऱ्या दादरपर्यंत चालवण्यात आल्या. हार्बर लाईनवरही अनेक लोकल फेऱ्या वडाळा रोडपर्यंत चालवल्या. त्यामुळे पुढील प्रवास पूर्ण करून कार्यालय गाठताना प्रवाशांची प्रचंड त्रेधातिरपीट उडाली. यात वृद्ध नागरिक आणि महिला प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. डाऊन दिशेने जाणाऱ्याही कित्येक लोकल रद्द करण्यात आल्या.

मरीन लाईन्स दरम्यान शॉर्टसर्किटमुळे स्फोट

मरीन लाईन्स स्थानकाजवळ दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास शॉर्टसर्किटमुळे मोठे स्फोट झाले. त्याचाही लोकल वाहतुकीवर परिणाम झाला. सुरक्षेच्या करणास्तव या मार्गावरून जाणाऱ्या काही लोकल थांबवल्या होत्या. विद्युत वाहिनीवर झाड कोसळले. त्या झाडालाही आग लागली.

लांब पल्ल्याच्या गाड्या खोळंबल्या

लोकल सेवेबरोबरच लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या वाहतुकीवरही मोठा परिणाम झाला. कोकणातून मुंबईत सकाळच्या सुमारास दाखल होणाऱ्या ट्रेनचे वेळापत्रक विस्कळीत झाले. त्यात अनेक प्रवाशांनी ठाणे किंवा पनवेल स्थानकातच उतरून पुढे खाजगी गाड्यांनी प्रवास करण्यास पसंती दिली. मुंबईतून सुटणाऱ्या अनेक लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या वेळेत बदल करण्यात आला.

दृश्यमानता कमी झाल्याने विमाने दुसरीकडे वळवली

मुसळधार पावसाच्या हजेरी वेळी मुंबईत दृश्यमानता कमी झाली होती. त्याचा विमान वाहतुकीवर परिणाम झाला. मुंबईहून उड्डाण घेणाऱ्या विमानांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला, तर मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर येणारी काही विमाने दुसऱ्या विमानतळांकडे वळवण्यात आली.

रिक्षा, टॅक्सीवाल्यांकडून प्रवाशांची लुटालूट

लोकल सेवेचा बोजवारा उडताच रिक्षा आणि टॅक्सीवाल्यांनी प्रवाशांकडून लूट सुरू केली. कमी अंतराचा प्रवास नाकारण्याचे प्रकार घडले, तर काही टॅक्सीचालकांनी मनमानी भाडेआकारणी केली. अडचणीत सापडलेल्या प्रवाशांनी टॅक्सी आणि रिक्षाचालकांच्या सांगण्यावरून ज्यादा पैसे देऊन इच्छित ठिकाण गाठले. परळ परिसरातील रुग्णालयांत येणाऱ्या रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना याचा अधिक फटका बसला.