
मुंबईतील शीव- प्रतीक्षानगर येथे नागरी सुविधांसाठी राखीव असलेल्या भूखंडावर सहकार भवन उभारण्याचा घाट सत्ताधाऱ्यांनी घातला आहे. यामुळे स्थानिक नागरिकांत प्रचंड असंतोष आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 27 मार्चला होत असलेल्या सहकार भवनच्या भूमिपूजन समारंभाच्या वेळी स्थानिकांकडून विरोध दर्शविला जाणार आहे.
शीव-प्रतीक्षानगर येथे सहकार भवन उभारण्यासाठी देण्यात आलेला भूखंड हा भाजी मार्केट, मच्छी मार्केट, पोस्ट ऑफिस, दवाखाना या मूलभूत सुविधांसाठी राखीव आहे. मात्र, स्थानिक नागरिकांना विचारात न घेताच हा भूखंड सहकार भवनची इमारत उभारण्यासाठी देण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयाला स्थानिकांकडून मोठा विरोध होत आहे. 27 मार्च रोजी शीव-प्रतीक्षानगर येथे होत असलेल्या सहकार भवनच्या भूमिपूजन कार्यक्रमाला स्थानिकांनी कडाडून विरोध केला आहे.


























































