लॉकडाऊनमुळे अॅकॅडमी बंद, मराठमोळा बॅडमिंटनपटू अक्षय देवलकरने व्यक्त केली चिंता

352

कोरोना व लॉकडाऊनमध्ये खेळाडूंच्या कारकीर्दीवर परिणाम होईल अशी चर्चा क्रीडावर्तुळात रंगू लागली आहे. मात्र याचप्रसंगी या खेळाडूंना घडवणाऱया प्रशिक्षकांचे काय हाल होत असतील याची चिंता कोणालाही नाही. कोरोना व लॉकडाऊनमुळे ऍकॅडमी बंद आहेत. त्यामुळे बॅडमिंटनच नव्हे तर इतर खेळांतील प्रशिक्षकांची आर्थिक स्थिती बिघडलीय. दैनिक ‘सामना’शी संवाद साधताना मराठमोळा बॅडमिंटनपटू अक्षय देवलकर याने प्रशिक्षकांना मोठय़ा नुकसानाला सामोरे जावे लागत आहे असे स्पष्ट मत व्यक्त केले आणि महाराष्ट्र सरकारने यासाठी पाऊल उचलायला हवे अशी इच्छाही व्यक्त केली.

फिटनेससाठी ऑनलाईन ट्रेनिंग
या काळात बॅडमिंटनपटूंना इतर खेळांतील खेळाडूंप्रमाणेच ऑनलाईन मार्गदर्शनावरच अवलंबून रहावे लागले. अद्याप सरावाला परवानगी देण्यात आलेली नाही. मात्र दुखापतीपासून कसे दूर रहावे, घरी बसून आपल्या डाएटवर कशाप्रकारे लक्ष ठेवावे, फिटनेस कसे राखावे याबाबत ऑनलाईन मार्गदर्शन प्रत्येक क्लब्सकडून खेळाडूंना यावेळी करण्यात येत आहे, अशी माहिती अक्षय देवलकर याने यावेळी दिली.

लस आल्यानंतरही काळजी घ्यावी लागेल
बॅडमिंटन हा खेळ कबड्डी, खो-खो, कुस्ती याप्रमाणे तितकासा बॉडी कॉण्टॅक्ट खेळ नाही. त्यामुळे सराव किंवा स्पर्धा सुरू झाल्यानंतर यामध्ये जास्त काही बदल होणार नाहीत. लढत संपल्यानंतर खेळाडू हॅण्डशेकपासून दूर राहतील. बस्स एवढाच बदल करावा लागेल. मात्र कोरोनावर लस आल्यानंतरही सर्वसामान्यांपासून सर्वच काळजी घेतील. सामाजिक अंतर, स्वच्छता याकडे गांभीर्याने पाहतील, असे अक्षय देवलकर आवर्जून नमूद करतो.

हैदराबादमध्ये ऑनलाइन फिजिकल ट्रेनिंग सुरू
कोरोनाच्या काळात पुलेला गोपीचंद यांनी कोचेससाठी क्लिनीकचे आयोजन केले होते. पण काही कारणामुळे ते पुढे सुरू राहू शकले नाही. मात्र हैदराबादमधील ऍकॅडमीमध्ये प्रशिक्षण घेत असलेल्या मोठय़ा खेळाडूंचे ऑनलाईन फिजिकल ट्रेनिंग सुरू आहे, असे अक्षय देवलकरने सांगितले.

सरावाला परवानगी द्यायला हवी
युरोपमध्ये काही स्पर्धांना सुरुवात झाली आहे. त्यामुळे आता हिंदुस्थानातही सरकारकडून आता सरावाला परवानगी द्यायला हवी. त्यासाठी काही अटी लागू केल्या तरी हरकत नाही. एका तासाच्या सेशनमध्ये कमीतकमी खेळाडूंना संधी दिल्यानंतर दुसऱया सेशनमध्ये आणखी काही खेळाडूंच्या बॅचला सराव करण्याची मुभा द्यायला हरकत नाही, असे अक्षय देवलकर याला वाटते.

ऑलिम्पिक पुढे ढकलले, सरावासाठी वेळ मिळाला
टोकियो ऑलिम्पिक पुढे ढकलल्यामुळे आता खेळाडूंना सरावासाठी आणखी वेळ मिळाला आहे. पण आता ऑलिम्पिक पात्रता फेरीमध्ये काही बदल झाल्यास पुन्हा खेळाडूंसमोर अडचण निर्माण होऊ शकते. तसेच ज्या खेळाडूला या वर्षी ऑलिम्पिक खेळून निवृत्त व्हायचे होते, तो खेळाडू आता पुढल्या वर्षी त्याच आत्मियतेने स्पर्धेत उतरेल का, हा प्रश्नही यावेळी निर्माण होत आहे, असे अक्षय देवलकर पुढे सांगतो.

आपली प्रतिक्रिया द्या