बंदी दरम्यान पक्षांच्या किलबिलाटाने गजबजले कर्नाळा अभयारण्य

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लॉकडाऊन, संचारबंदी दरम्यान घालण्यात आलेल्या बंदीमुळे येथील कर्नाळा अभयारण्यात कधी नव्हे ती नीरव शांतता पसरली आहे. या शांततेत अभयारण्यात विविध पक्षांचा मंजुळ आवाजाचा किलबिलाट वाढला आहेच. त्याशिवाय अभयारण्यात क्वचितच पाहायला मिळणाऱ्या आणि सर्वकाळ खाद्यासाठी रस्त्यांवरच ठाण मांडून बसणारे सुमारे 80 टक्के कावळे आणि माकडांनी आता आपला मोर्चा अभयारण्याकडे वळविला असल्याची माहिती कर्नाळा अभयारण्य विभागाचे आरएफओ प्रदीप चव्हाण यांनी दिली.

जगभरात पसरलेल्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे प्राणी, पक्षी आदी वन्यजीव बाधित झाल्यांच्या काही घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे लॉकडाऊन, संचारबंदी दरम्यान घालण्यात आलेल्या बंदीत देशभरातील प्राणी संग्रहालय, अभयारण्य पर्यटकांसाठी 15 एप्रिलपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशानंतर देशभरातील प्राणी संग्रहालय, अभयारण्यांना टाळे लावण्यात आले आहे. मुंबईपासून जवळच असलेले पनवेल येथील कर्नाळा अभयारण्य एक पर्यटनस्थळ आहे. या अभयारण्यात शेकडो जातींचे आकर्षक तसेच स्थलांतरित पक्ष्यांची आणि बिबटे, हरिण,भेकर, रानडुक्कर, कोल्हे,ससे, वानर आदी प्राण्यांची रेलचेल असते. त्यामुळे पनवेल येथील अभयारण्यात मोठ्या संख्येने पर्यटक येत असतात. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुकारण्यात आलेल्या संचारबंदी, लॉकडाऊनमध्ये कर्नाळा अभयारण्यही पर्यटकांसाठी मागील महिन्यापासून बंद करण्यात आले आहे.

पर्यटकांसाठी कर्नाळा अभयारण्य बंद ठेवण्यात आल्यामुळे अभयारण्यात वातावरण, आकाश निरभ्र झाले आहे. त्यामुळे परिसरात कधी नव्हे ती नीरव शांतता पसरली आहे. या शांततेत अभयारण्यात विविध पक्षांचा मंजुळ आवाज ऐकू येऊ लागला आहे. विविध जातींच्या पक्षांचा किलबिलाट वाढला आहे. अभयारण्य बंद करण्याआधी मोठ्या प्रमाणावर माकडे महामार्गावरील विविध रस्त्यांवरच ठाण मांडून बसलेले असायचे. दररोज येथे येणाऱ्या-जाणाऱ्या हजारो पर्यटकांकडून मिळणाऱ्या खाद्यपदार्थांमुळे माकडे अभयारण्याकडे फिरकत नव्हती. अशीच स्थीती कावळ्यांची होती. लॉकडाऊन, संचारबंदी दरम्यान घालण्यात आलेल्या बंदीमुळे अभयारण्यात क्वचितच पाहायला मिळणाऱ्या आणि सर्वकाळ खाद्यासाठी रस्त्यांवरच ठाण मांडून बसणारे कावळे आणि माकडांनी पोट भरण्यासाठी आता आपला मोर्चा कर्नाळा अभयारण्याकडे वळविला आहे. त्यामुळे बंदीनंतर अभयारण्यात कधीही न दिसणाऱ्या कावळे आणि माकडांची संख्या आता 70 ते 80 टक्के इतक्या मोठ्या प्रमाणावर वाढली असल्याची माहिती कर्नाळा अभयारण्य विभागाचे आरएफओ प्रदीप चव्हाण यांनी दिली.

कर्नाळा अभयारण्य परिसरात बंदी घालण्यात येण्याआधी वाढत्या पर्यटकांच्या हालचालींमुळे बिबटे, हरिण, भेकर, रानडुक्कर, कोल्हे, ससे आदी प्राणी पिण्याच्या पाण्यासाठी पाण्याच्या ठिकाणी किंवा जवळपासही फिरकताना दिसत नव्हते. मात्र बंदी दरम्यान हेच प्राणी मोठ्या संख्येने पाण्याच्या ठिकाणी दृष्टीस पडत आहेत. हजारो किलोमीटरचा प्रवास करत श्रीलंका, आशिया खंडातुन मोठ्या प्रमाणावर विविध जातींचे आकर्षक स्थलांतरित पक्षी हजारोंच्या संख्येने कर्नाळा अभयारण्यात येतात. ठराविक मोसमात येणारे पक्षी नैसर्गिक आवासामुळे प्रजननासाठी नित्यनेमाने अभयारण्यात येतात. अंडी घालतात. पिल्लांना जन्म देतात. पिल्लांच्या पंखात उडण्याचे बळ आल्यानंतर शेकडो जातीचे स्थलांतरीत पक्षी आपल्या पिल्लांसकट मार्गस्थ होतात. तसेच लॉकडाऊन, संचारबंदी दरम्यान घालण्यात आलेल्या बंदीमुळे येथील कर्नाळा अभयारण्य परिसरात आगीची एकही घटना घडली नसल्याची माहितीही आरएफओ प्रदीप चव्हाण यांनी दिली. बंदीकाळात पशुपक्षी नैसर्गिक आवाजात मुक्तपणे संचार करीत असल्याचे त्यांनी सांगितले.