लॉकडाऊनमध्ये डोक्याचं पनीर केलं! 2020 ची गुगल सर्च यादी जाहीर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

2020 वर्ष संपायला आलंय. लवकरच नवीन वर्ष येईल. यावर्षी कोरोना विषाणूचा प्रकोप साऱया जगाने अनुभवला. मात्र या काळातही गुगल सर्च करून नवनवीन माहिती घेण्यामध्ये लोक आघाडीवर होते. हिंदुस्थानींच्या बाबतीत सांगायचं तर, पनीर कसं बनवायचं? हा सर्वाधिक हिंदुस्थानींना पडलेला प्रश्न होता. त्याचं उत्तर गुगल सर्च करून हिंदुस्थानींनी मिळवलं. याशिवाय कोरोना काळात रोगप्रतिकारशक्ती कशी वाढवायची, इथपासून सॅनिटायजर कसं तयार करायचं, हे जाणून घेण्यातही हिंदुस्थानी आघाडीवर होते.

गुगलने ‘इयर इन सर्च 2020’ ची यादी प्रसिद्ध केली आहे. यामध्ये हिंदुस्थानींनी यावर्षी गुगलवर कोणत्या गोष्टींचा शोध घेतला किंवा कोणत्या गोष्टींची माहिती मिळवली, ते सांगण्यात आले आहे. त्यासाठी गुगलने यावर्षी ’कसं करायचं’ आणि ‘काय करू’ या शब्दांशी जोडलेली विशेष यादी जाहीर केली आहे. त्यावरून असं दिसतंय की कोविड 19, इम्युनिटी, प्लाझ्मा थेरेपी हे सर्च यावर्षी भरपूर झाले. सर्वात लक्षवेधी गोष्ट म्हणजे लॉकडाऊनमध्ये लोक घरी होते. त्यामुळे त्यांनी गुगल सर्चवर पनीर बनवण्याची पद्धत सर्वाधिक प्रमाणात जाणून घेतली.

आयपीएल टॉप ट्रेंडिंगमध्ये

आयपीएल क्रिकेट हे कोरोना काळात गुगल सर्चमध्ये टॉपवर राहिले. सर्व समस्या, अडचणी मागे ठेवून क्रिकेटप्रेमींनी आयपीएलचा मनमुराद आनंद घेतला. आयपीएलखालोखाल दुसऱया क्रमांकावर कोरोना व्हायरस, तिसऱया क्रमांकावर अमेरिकेचा निवडणूक निकाल राहिला. पंतप्रधान किसान योजना आणि बिहार निवडणूक निकाल अनुक्रमे चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावरील गुगल सर्च ठरले.

गुगलवर काय आणि कसं?

– डालगोना कॉफी कशी बनवायची?
– पॅनकार्डला आधार कार्ड कसं जोडाल?
– घरात सॅनिटायजर कसं बनवायचं?
– कोरोना विषाणू आणि हंता व्हायरस काय आहे
– सीएए म्हणजे काय?