आळंदीत कोरोनाचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी आठ दिवस लॉकडाउन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तीर्थक्षेत्र आळंदी व परिसरात कोरोनाचे प्रादुर्भाव रोखण्यासाठी 6 ते 13 जुलै दरम्यान लॉकडाऊन जारी करण्यात आला आहे. या कलावधीत अत्यावश्यक सेवा वगळून संपूर्ण लॉकडाउनचा प्रभावी पणे अंबलबजावणी करण्यात येणार आहे. नागरिकांनी विनाकारण फिरू नये तसेच शासनाच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन मुख्याधिकारी समीर भुमकर यांनी आळंदीकर नागरिकांना केले आहे.

आळंदी परिसरात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला असून श्रीक्षेत्र आळंदी कोरोनामुक्त करण्यासाठी प्रशासनाने विविध उपाय योजना राबविण्यास सुरुवात केली आहे. या उपाय योजनेतून पुढील आठ दिवस आळंदी अत्यावश्यक सेवा वगळून लॉकडाउन करण्यात येत आहे.

कोरोना महामारीचे पार्श्वभूमीवर 6 ते 13 जुलै या कलावधीत आळंदीत सकाळी 6 ते रात्री 9 या काळात नगरपरीषद कार्यक्षेत्रातील नागरिकांना विनाकारण घराबाहेर फिरण्यास मर्यादा आणल्या आहेत. मुख्याधिकारी समिर भुमकर म्हणाले, आळंदी शहरात सोमवार पासून पुढील आठ दिवसांसाठी लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. यात शासनाने ठरवून दिलेल्या कोणत्याही अत्यावश्यक सेवा बंद राहणार नाहीत. शासकीय कार्यालये, दवाखाने, बँका, पतसंस्था, मेडिकल कार्यरत राहणार आहे. कंटेन्मेंट झोन वगळता सर्व कामगार, कर्मचारी यांना कामावर जाता येणार आहे. आळंदीतील किराणा,भाजीपाला व दुधाची विक्री करणारी दुकाने या काळात सकाळी 7 ते दुपारी 1 पर्यंत सुरू राहतील. आळंदी प्रशासनास नागरिकांनी सहकार्य करून आळंदी कोरोना मुक्त करण्यास साथ देण्याचे भुमकर यांनी आवाहन केले आहे.