लॉकडाऊनमुळे श्री क्षेत्र नरसोबा वाडीत शुकशुकाट! स्थानिक व्यावसायिकांचे आर्थिक नुकसान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशात सर्वत्र सध्या कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाचा पार्श्वभूमीवर गेल्या दीड महिन्यापासून लॉकडाऊन सुरू आहे. याला शिरोळ तालुक्यातील दत्त क्षेत्र नृसिंहवाडी ही अपवाद नाही. 17 मार्च पासून येथील दत्त मंदिर दर्शनासाठी बंद करण्यात आले आहे आणि 17 मेपर्यंत लॉक डाऊन असल्याने ते बंदच राहणार आहे. तर 19 मार्च पासून संपूर्ण गावातले व्यवहार बंद ठेवून लॉकडाऊन करण्यात आले असून त्याची कडकपणे अंमलबजावणी करण्यात आली आहे.

या तीर्थक्षेत्रावर प्रत्येक पौर्णिमा, गुरुवार, शनिवार, रविवार, सार्वजनिक सुट्ट्या आणि सुट्ट्या तसेच एप्रिल-मे महिन्यात असणारा लग्नसराई, मौजीबंधन आदी कारणामुळे सातत्याने हजारो भाविकांची येथे दररोज गर्दी असते. देशाच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या यात्रेकरुंवर येथील अर्थकारण अवलंबून असते. मात्र आता 50 दिवस झाले लॉकडाऊनमुळे एकही भाविक फिरकलेला नाही. यामुळे मंदिर परिसर आणि मुख्य व्यापारी पेठेत तसेच नेहमी गजबजलेल्या मंदिर मार्ग, एसटी स्टँड आदी परिसरात निरव शांतता आहे. येथील दत्त मंदिर प्रशासन, ग्रामपंचायत, व्यापारी, अन्य छोटे-मोठे उद्योजक, देवता कृत्य व धार्मिक विधी करणारे ब्रह्मवृंद, शेतकरी, हॉटेल, यात्री निवास, अन्य छोटी-मोठी दुकाने, प्रसिद्ध बासुंदी दुकाने, या सर्वच घटकावर मोठा आर्थिक परिणाम झाला असून लाखो रुपयांच्या नुकसानीचा सामनाही येथील प्रत्येकाला करावा लागत आहे.

लॉकडाऊनमुळे दत्त मंदिर दर्शनासाठी बंद असल्याने गुढीपाडवा, रामनवमी, हनुमान जयंती, श्रीमन नारायण स्वामी पुण्यतिथी उत्सव, चैत्र पोर्णिमा, वैशाख पौर्णिमा हे कोणतीही सण-उत्सव साजरे करता आले नाहीत. किंबहुना नित्यनेमाची पूजा मोजक्याच सेवेकऱ्यांच्या वतीने केली जात आहे. मंदिरातील नित्य कार्यक्रम भाविकांविना मोजक्या च पुजारी व सेवेकरी मंडळींच्या उपस्थितीत पार पडत आहेत.

दरम्यान हवामान खात्याने यंदा पर्जन्यमान मोठ्या प्रमाणात होणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे कोरोना विषाणूच्या संकटाचा सामना करता करता दोन महिन्यानंतर घेणाऱ्या प्रचंड महापुराच्या संकटाची भीती आता येथील प्रत्येक रहिवाशांच्या चेहऱ्यावर दिसत आहे. 2019 मधल्या महापुरामधून कसेबसे सावरत असतानाच 50 दिवस गाव बंद राहिल्याने आलेले आर्थिक संकट आणि पुढे पावसाळ्यातील परिस्थितीची धास्ती यामुळे येथील सर्वच मंडळी मेटाकुटीला आली आहेत.