
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या रायगड जिल्ह्यात लॉक डाऊन सुरू आहे. अनेक व्यवसाय बंद आहेत. असे असतानाही जिल्हा प्रशासनाने ठराविक दुकानांना परवानगी दिल्याने रायगड जिल्ह्यात आषाढ अमावस्या म्हणजे गटारी अमावस्या जोरात साजरी झाली आहे.
15 जुलै ते 26 जुलै या कालावधीत रायगड जिल्ह्यात लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. या लॉक डाऊन दरम्यान फक्त औषधांची दुकाने व दूध विक्रीची दुकाने सुरू ठेवण्यात आली होती. याव्यतिरिक्त सर्व प्रकारचे दुकाने बंद करण्यात आले होते. त्यामुळे यावर्षी गटारी अमावस्या साजरी होणार की नाही असा प्रश्न खवय्यांना पडला होता. श्रावण महिना गणपती व नवरात्र यादरम्यान लाखो नागरिक मांसाहार करीत नाहीत. त्यामुळे गटारी अमावस्येला अनन्य साधारण महत्त्व असतं. या दिवशी खवय्ये आपल्या घरात चमचमीत मांसाहार बनवून ही अमावस्या साजरी करतात.
रायगड जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी शनिवार 18 जुलै रोजी एक आदेश पारित करून त्या आदेशाद्वारे रायगड जिल्ह्यातील चिकन, मटण, मच्छी, अंडी, भाजीपाला, किराणामाल व दुधाची दुकाने सकाळी 6 ते सकाळी 11 वाजेपर्यंत उघडण्यास परवानगी दिल्याने खवय्यांनी आनंद व्यक्त केला. तसेच परवानगी दिलेल्या व्यावसायिकांमध्ये ही आनंदाचे वातावरण पसरले आहे.
रविवारी भल्या पहाटे 6 वाजल्यापासूनच खवय्यांनी आपल्या आवडत्या चिकन मटन दुकानाच्या बाहेर लांबच लांब रांगा लागल्या होत्या. यावेळी या खवय्यांनी तोंडाला मास्क लावून सोशल डिस्टंसिंगचे काटेकोरपणे पालन केले होते. तर काही खवय्यांनी कोळीवाड्यात जाऊन वेगवेगळ्या प्रकारच्या मच्छीची खरेदी केली. भल्या पहाटे भाजीची व किराणा मालाची दुकाने सुद्धा उघडण्यात आली होती. घरात वेगवेगळ्या प्रकारचे खाद्यपदार्थ बनवण्याकरिता लागणाऱ्या सामानाची खरेदी रायगडकरांनी सकाळ सकाळीच केली. अशाप्रकारे रायगडकरांनी गटारी अमावस्या नेहमीप्रमाणे दणक्यात साजरी केली.
























































