
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरात आजपासून (दि.22) संध्याकाळी 7 ते दुसऱ्या दिवशी सकाळी 7 वाजेपर्यंत पुन्हा संचारबंदी लागू करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश सहपोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी काल रात्री साडेबारा वाजता काढले. यापूर्वी महापालिका आयुक्तांनी शहरातील आस्थापना आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आदेश काढले आहेत. त्यानुसार ‘कंटेन्मेंट’ झोन क्षेत्र बंदच राहणार आहे. दरम्यान शहरातील वाढती गर्दी लक्षात घेऊन सहपोलिस आयुक्तांनी शहारत उर्वरित ठिकाणी नागरिकांना एकत्रित जमने, फिरणे, वाहनांमध्ये प्रवास करता येणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.
राज्यात लॉकडाऊन वाढविण्यात आला असून ठिकठिकाणी ‘कंटेन्मेंट’ झोन आणि नॉन ‘कंटेन्मेंट’ झोन असे दोनच भाग तयार केले आहेत. यानुसार ‘कंटेन्मेंट’ झोनमध्ये नियम पूर्वी सारखेच आहेत. तर नॉन ‘कंटेन्मेंट’ झोनमध्ये काही प्रमाणात शिथिलता आणली आहे. त्यानुसार शहरात संध्याकाळी 7 ते सकाळी 7 वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. अत्यावश्यक सेवा वगळता यावेळेत कर्फ्यु लागू केला आहे. यानुसार कोणालाही विनाकारण बाहेर पडता येणार नाही. तसेच वाहने देखील रस्त्यावर आणता येणार नाहीत. अन्यथा कडक कारवाई करण्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे. दि. 31 मे पर्यंत आदेश लागू राहणार आहेत.
























































