लॉकडाऊन काळात गर्भनिरोधक गोळ्या, कंडोमच्या मागणीत दुप्पट वाढ; डॉक्टर म्हणतात…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोना विषाणूचा सामूहिक संसर्ग रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन लागू करण्यात आला. जवळपास गेल्या 2 महिन्यापासून अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकाने बंद आहेत. एकीकडे लॉकडाऊनमुळे लोकांना घरातून बाहेर पडणे अवघड झाले आहे, तर दुसरीकडे या काळात गर्भचाचणी करण्याची किट्स, गर्भनिरोधक गोळ्या आणि कंडोमच्या विक्रीत दुप्पट वाढ झाल्याचे निदर्शनास आले आहे.

गाझियाबाद येथील ‘अपोलो फार्मसी’च्या फार्मासिस्टने याबाबत माहिती देताना सांगितले की, लॉकडाऊन लागू झाल्यापासून अँटी बायोटिक्स औषधांची मागणी घटली आहे. मात्र कंडोम, गर्भनिरोधक गोळ्या आणि गर्भचाचणी करण्याच्या किट्सच्या विक्रीत वाढ झाली आहे. त्यांनी नक्की आकडा सांगण्यास नकार दिला मात्र ही वाढ जवळपास दुप्पट झाल्याचे मान्य केले. लॉकडाऊनपूर्व काळात एका महिन्याला गर्भनिरोधक गोळ्यांचे पाच ते सहा डब्बे विकले जायचे मात्र आता आठवड्याला 10 पेक्षा जास्त डब्यांची विक्री होत आहे. अनावश्यक गर्भधारणा टाळण्यासाठी कंडोम आणि गर्भचाचणी किट्सची मागणीही वाढल्याची माहिती त्यांनी दिली.

अँटी बायोटिक्स औषधांच्या विक्रीत घट
लॉकडाऊनच्या आधी अँटी बायोटिक्स गोळ्यांची विक्री जोमात सुरू होती, मात्र लॉकडाऊन काळात यात घट झाल्याचे त्यांनी सांगितले. कोरोना विषाणूमुळे घरातील स्वच्छता राखण्यात येत आहे, तसेच बाहेर पडणे कमी झाल्याने इन्फेक्शन होत नाहीये आणि त्यामुळे अँटी बायोटिक्सची विक्री कमी झाली आहे. असे असले तरी या काळात डोकेदुखी आणि अंगदुखीच्या गोळ्या, जेल, स्प्रे यांची मागणी वाढल्याचे त्यांनी सांगितले.

डॉक्टर म्हणतात…
लॉकडाऊन काळात कंडोम, गर्भनिरोधक गोळ्यांची मागणी वाढणे सामान्य असल्याचे दिल्लीतील हिंदुराव रुग्णालयाचे सीएमओ आणि मानसिक रोगाचे डॉक्टर जितेंद्र कुमार यांनी म्हटले आहे. लोक तणावमुक्त असल्याने आणि भरपूर वेळ मिळत असल्याने लैंगिक जीवनाचा आनंद घेत आहेत यात काही वावगे असण्याचे कारण नाही असेही ते म्हणाले.