
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विविध कारणामुळे आंतरजिल्हा प्रवासासाठी नागरिकांना पोलिसांचा ई-पास यापुढील काळातही आवश्यक असणार आहे. राज्य सरकारने आंतरजिल्हा प्रवासाबाबत अजूनही स्पष्ट सूचना दिलेल्या नाहीत, त्यामुळे प्रवासासाठी ई-पासची मुदत वाढविण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
लॉकडाउनचे काही निर्बंध कमी करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. मात्र, ई- पासबाबत नवीन कोणत्याही सूचना आली नाही. त्यामुळे आंतरजिल्हा प्रवासासाठी ई-पासची जुनी पद्धतीच सुरू राहणार असल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त बच्चन सिंह यांनी दिली आहे. अनलॉकमध्ये नागरीकांना वेगवेगळ्या जिल्ह्यासह अन्यत्र जाणे सोपे व्हावे, यासाठी पोलिसांकडून डिजीटल पासची सुविधा देण्यात आली आहे. लॉकडाऊन वाढविल्यानंतर डिजिटल पासची मर्यादा वाढविण्यात आली होती. संचार मनई आदेशाचे निर्बंध काही प्रमाणात शिथिल झाल्यानंतर नागरीकांची अन्य जिल्ह्यात व राज्यात जाण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यापार्श्वभूमीवर प्रवासासाठी ई-पास आवश्यक असल्याचे पोलिसांनी सांगितले. लॉकडाउन निर्बध 31 जुलैनंतर शिथिल होणार असल्याचे राज्य सरकारने स्पष्ट केले. त्यामुळे प्रवासासाठी पासची गरज लागणार की नाही? असा प्रश्न नागरीकांकडून विचारला जात होता. त्यासंदर्भात पोलिसांनी प्रवासासाठी ई- पास गरजेचा असल्याचे सांगितले आहे.
























































