लॉकडाऊनमध्येही रोज 20 हजार क्विंटल फळे आणि भाजीपाल्याची विक्री

421

शेतकऱ्यांनी शेतात घाम गाळून अतिशय कष्टाने पिकवलेल्या शेतमालाची कृषी विभागाच्या पुढाकारामुळे थेट मोठय़ा शहरातील सोसायटय़ांमध्ये व ऑनलाईन विक्रीसाठी बाजारपेठ उपलब्ध होत आहे. त्यामुळे सध्याच्या लॉकडाऊनमध्येही दररोज तब्बल वीस हजार क्विंटल फळे व भाजीपाल्याची विक्री होत आहे.

राज्यातील लॉकडाऊननंतर नागरिकांना जीवनावश्यक वस्तू पुरविण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घेत किराणा दुकाने, भाजीपाला, औषधे यांची दुकाने सुरू ठेवली आहेत. मात्र ग्रामीण भागातील शेतकऱयांनी कष्टाने पिकविलेला शेतमाल शहरी भागात पोहोचविण्यासाठी मोठे आव्हान होते. कृषि विभागाच्या नियोजनामुळे मोठय़ा शहरांमधील सोसायटय़ांमध्ये थेट शेतमाल विक्रीची आणि ऑनलाईन विक्रीची व्यवस्था निर्माण केल्याने राज्यात 2 हजार 986 शेतकरी उत्पादक गट, आत्मा गट यांच्या माध्यमातून शेतमालाची ऑनलाईन आणि थेट विक्री सुमारे दररोज 20 हजार क्विंटल होत आहे. यासाठी 34 जिह्यांमध्ये 2830 थेट विक्रीची ठिकाणे निवडण्यात आली आहेत. कृषि विभागाचे सचिव एकनाथ डवले आणि आयुक्त सुहास दिवसे यांनी यामध्ये पुढाकार घेतला आहे.

या संकट काळात शेतकरी हित केंद्रस्थानी ठेवत शहरी भागातील नागरिकांना वेळेवर भजीपाला, फळे उपलब्ध व्हावीत आणि नाशवंत शेतमालला बाजारपेठ मिळावी यासाठी कृषि विभागाने केलेल्या नियोजनामुळे दररोज सुमारे 20 हजार क्विंटल शेतमालाची विक्री होत आहे. विभागाचे अधिकारी कर्मचारी करीत असलेल्या परिश्रमाचे कृषिमंत्री दादा भुसे यांनी कौतुक केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या