
कोरोना विषाणूचा संसर्ग व प्रादूर्भाव रोखण्यासाठी पारीत केलेला आदेशाचे उल्लंघन करुन आपल्या कारच्या (क्र.एमएच 14/ HD/ 1337) समोरील काचेवर पोलीस या नावाचा फलक लावुन विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या एका व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुमित गोविंद वरलीकर (वय 26, रा. दहिवली, ता. मावळ, जि.पुणे, मुळ रा. जनता काॅलनी रुमडे चौक, वरळी व्हिलेज, वरळी, मुंबई) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. याबाबत पोलीस काॅन्स्टेबल चंद्रकांत सुभाष गव्हाणे यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चेकपोस्टवर तैनात असलेल्या पो.हवा. एफ. एम. सय्यद यांनी संबंधित तरुणाला अडवून त्याच्याकडे चौकशी केली असता, त्याने सुरुवातीला मी पोलीस असुन बंगल्यातील कुत्र्यांना पिडीग्री आणण्यासाठी लोणावळा शहरात जात असल्याचे सांगितले. मात्र रितसर खात्री केली असता तो पोलीस नसुन त्याने संचारबंदी कालावधीत लोणावळा शहरात प्रवेश देण्यासाठी पोलीस असल्याची खोटी बतावणी करुन तोतयागिरी करीत असल्याचे लक्षात आले. याप्रकरणी संबंधित तरूणाच्या विरोधात भा.द.वि. कलम 419, 188 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पो.नि.मनोज यादव यांच्या मार्गदर्शनाखाली लोणावळा पोलीस पुढील तपास करीत आहेत


























































