कोरोना इफेक्ट; ग्राहक टिकवण्यासाठी आटापिटा, टाटा स्कायचे 70 लाख ग्राहकांसाठी नवे पॅकेज

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे ज्या ग्राहकांना मासिक शुल्क भरणे शक्य झाले नाही, अशा 70 लाख ग्राहकांसाठी डीटीएच सेवा देणाऱ्या टाटा स्कायने आता नवे पॅकेज आणले आहे. यात चॅनेल्स कमी करण्यात आली असून मासिक बिलही कमी करण्यात आले आहे. त्यामुळे प्रत्येक ग्राहकाची 60 ते 100 रुपयांची बचतही होणार आहे. येत्या 15 जूनपासून ही नवी योजना सुरू होणार आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर, करण्यात आलेल्या लॉकडाऊनचा फटका सर्व क्षेत्रांना बसला आहे. यात चित्रपट, मालिका या मनोरंजन क्षेत्राबरोबर त्या प्रसारित करणाऱ्या, डायरेक्ट टू होम (डीटीएच) सेवा देणाऱ्या टाटा स्काय सारख्या कंपन्यांना बसला आहे. लॉकडाऊनमुळे नवीन मालिका, चित्रपट तयार होत नसल्यामुळे प्रेक्षकांनी टीव्ही पाहणे कमी केले आहे.

मे महिन्यात देशभरातील 50 लाख ग्राहकांमधील 70 टक्के ग्राहकांनी टाटा स्कायच्या वेबसाईट आणि अप्लिकेशनला भेट देऊन नोंदणी रद्द करण्याबाबत आणि मासिक बिल कमी करण्याबाबत माहिती घेतली. त्या पार्श्वभूमीवर, ग्राहक कमी होऊ नयेत आणि ग्राहकांना मासिक बिलही भरता यावे, यासाठी टाटा स्कायने हे नवे पॅकेज आणले आहे. याबाबत टाटा स्कायच्या ग्राहकांना कळवण्यात आले आहे.

  • नव्या पॅकेजमध्ये ग्राहकाचे मासिक बिल हे 350 रुपये किंवा त्यापेक्षा कमी असावे, यावर भर देण्यात येईल.
  • नव्या पॅकेजमुळे कमी चॅनेल्स देऊन ग्राहक टिकवणे टाटा स्कायला शक्य होणार आहे, असे टाटा स्कायच्या प्रवक्त्याने म्हणणे आहे.
  • बंद केलेले चॅनेल्स पुन्हा सुरू करणे त्याचबरोबर नवीन पॅकेज घेण्याबाबत ग्राहक कंपनीला मिस कॉल देऊन सेवा सुरू करू शकतो.
  • टाटा स्कायकडे सध्या 1 कोटी 80 लाख ग्राहक असून लॉकडाऊनच्या काळात त्यातील 15 लाख ग्राहक गमावले आहेत.