सातारा जिल्ह्यात लॉकडाऊन होणार नाही; जिल्हाधिकाऱ्यांनी दिली माहिती

सातारा जिल्ह्यात शनिवारपासून पुन्हा लॉकडाउन होणार असल्याच्या चर्चेमुळे कराड शहरात नागरिकांनी वाहनात पेट्रोल भरण्यासह दुकानात साहित्य नेण्यासाठी गर्दी केली. मात्र जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी प्रशासनाने लॉकडाउनबाबतचा निर्णय घेतला नसल्याचे स्पष्ट केले आहे. काेणत्याही अफवांवर विश्वासू ठेवू नका असे आवाहन केले आहे.

दुपारनंतर शहरातील रस्त्यावरील गर्दीही वाढली होती. त्यामुळे शहरात वाहतूक वाढली. मात्र लॉकडाऊनबाबत अधिक माहिती मिळत नसल्याने व जिल्ह्यात सर्व अधिकाऱ्यांची बैठक सुरू असल्याने लॉकडाऊन होणार असल्याच्या शक्यतेला पुष्टी मिळाली. त्यातून लोक घराबाहेर पडले. माध्यमांच्या प्रतिनिधींकडे लोक लॉकडाऊनची खात्री करण्यासाठी दूरध्वनी करत होते.

दरम्यान, याबाबत पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्यापर्यंत ही अफवा व कराड शहरातील रस्त्यावर झालेल्या गर्दीची माहिती मिळाली. तातडीने त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना त्याबाबतचा खुलासा करण्याच्या सूचना केल्या. जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी खुलासा केला आहे. बाहेर पडणाऱ्या लोकांनी मास्कचा वापर, सुरक्षित अंतर आदींसह नियमांचे पालन करण्याचेही आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या