चोरट्यानी मारले व्यापाऱ्यांचे काटे, कल्याणच्या एपीएमसीत लुटालूट; 50 गल्लेही तोडले

459

लॉकडाऊन आणि संचारबंदीची कडक अंमलबजावणी सुरू असतानाही कल्याण डोंबिवलीत चोरीच्या घटना घडतच आहेत. आज तर चोरट्यानी कहर केला. कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीतील संपूर्ण फुल मार्केट चोरट्यानी फोडले. जवळपास 50 व्यापाऱ्यांचे इलेक्ट्रॉनिक वजन काटे लांबवले शिवाय गल्ले तोडून रोकड लांबवली. आधीच कोरोनामुळे दोन महिने फुल विक्रेत्यांच्या हाताला कांहीच काम नसताना चोरट्यानी किमती वजनकाटे लंपास केल्याने व्यापारी हबकून गेले आहेत.

दादर फूल मार्केटनंतर सर्वाधिक उलाढाल कल्याण फूल मार्केटमध्ये होते. ठाणे जिल्ह्यातील फुलांचा होलसेल व्यापार येथे चालतो. दररोज 55 ट्रक, टेम्पोमधून पुणे, नगर, गुजरात येथून फुले येतात. झेंडू, जरबेरा, गुलाब, मोगरा आदी सर्व प्रकारच्या फुलांचा बाजार समितीत दरवळ असतो. कोरनाचा संसर्ग टाळण्यासाठी बाजार समितीत शंभर टक्के लॉकडाऊन आहे. त्यामुळे फुलांची आवक पूर्णपणे थांबली आहे. कल्याण बाजार समितीत 550 फूल विक्रेते रोज व्यवसाय करतात. कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी कल्याण डोंबिवलीत लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी सुरू आहे. गेले दोन महिने सर्व व्यवहार ठप्प आहेत. बाजार समितीत शुकशुकाट असल्याने चोरट्यांना आयतीच संधी मिळाली. चोरट्यानी आपला मोर्चा जीवनावश्यक वस्तूंच्या चोरीकडे वळवला असताना आता व्यापारी पेढ्याही फोडल्या जात आहेत. फुल मार्केट मधील 50 फुलांचे गाळे तोडून आतील इलेक्ट्रॉनिक वजन काटे लांबवले. शिवाय गल्लेही फोडून रोकड लांबवली. मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांच्या टोळीने हा प्रताप केला. आज सकाळी फुल विक्रेत्यांच्या निदर्शनास हा प्रकार आल्यानंतर पोलिसांना चोरी झाल्याची माहिती देण्यात आली.

सीसीटीव्ही आधारे शोध

बाजार समितीत चारही बाजूनी सीसीटीव्हीचे जाळे आहे. फुल मार्केटच्या दर्शनी भागातही सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. याचा आधार घेऊन पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत. चोरटे स्थानिक असल्याचा अंदाज आहे.

दुष्काळात तेरावा महिना

दोन महिने व्यवसाय बंद असल्याने आमची उपासमार सुरू आहे. त्यातच इलेक्ट्रॉनिक काटे चोरीला गेल्याने दुष्काळात तेरावा महिना अशी आमची स्थिती झाली आहे. सरासरी तीन हजारांपासून दहा हजारांपर्यंत काट्यांची किंमत आहे. – राजू शिंदे, नितीन साफाळे, फूल विक्रेते.

इम्युनिटीसाठी चोरट्यांचा च्यवनप्राशवर डल्ला

उल्हासनगर – इम्युनिटी पॉवर वाढवण्यासाठी चोरट्यांनी चक्क च्यवनप्राशवरच डल्ला मारल्याची घटना उल्हासनगरमध्ये उघडकीस आली आहे. येथील एका मेडीकल दुकानात पहाटेच्या सुमारस शटर उचकटून चोरी केल्याचासंपूर्ण घटना सीसीटीव्हीत केंद्र झाली आहे. कांचन मेडिकल स्टोर्स असे मेडिकलचे नाव असून दोन अज्ञात चोरट्यांनी 15 हजारांची रोखड लंपास केली आहे. तसेच च्यवनप्राश, चॉकलेट आणि पावडरचे डब्बेही चोरी केले आहे. याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या