‘पसंती’ ऑनलाईन, पण निर्णय ‘कांदेपोहे’ खाऊनच; डॉक्टर, NRI चा भाव घसरला

1302

कोरोना संसर्गाच्या लॉकडाऊनमुळे लग्नाची गोष्टही थांबलेली होती. या काळात वधू-वर सूचक मंडळाने ‘व्हिडिओ कॉलिंग’च्या माध्यमातून घेतलेल्या ऑनलाईन मेळाव्यांमध्ये ‘पसंती’ झालेली असली तरी निर्णय मात्र प्रत्यक्ष ‘कांदेपोहे’ कार्यक्रमानंतरच होईल, असा कल असल्यामुळे नव वधूवरांना लॉकडाऊन पूर्ण संपण्याचीच वाट पहावी लागणार आहे.

लॉकडाऊन लागू होण्यापूर्वी ज्यांचे विवाह जुळले, ते पार पडले आहेत. मात्र, त्याचे प्रमाण खूपच कमी आहे. गेल्या तीन महिन्यांत शहरातल्या काही वधू-वर सूचक मंडळांची प्रत्यक्ष नोंदणी थांबली आहे. ऑनलाइन नोंदणी आणि विवाहेच्छुकांचे ऑनलाइन मेळावे पार पडताना दिसत आहेत. या मेळाव्यात सहभागी होऊन एकमेकांच्या अपेक्षांवर चर्चा होत असून, प्राथमिक पसंतीही होत आहे. पण, प्रत्यक्ष भेटूनच आणि घरातील मंडळींचा होकार आल्यावर लग्नाची बोलणी करायची, असे चित्र सध्या दिसत आहे. ऑनलाइन मेळाव्याला प्रतिसाद चांगला असला तरी प्रत्यक्ष विवाहाच्या बेडीत अडकण्याचा निर्णय हा लॉकडाऊन उठल्यानंतरच होईल, असं दिसत आहे.

डॉक्टर नवरा नको गं बाई
एक काळ असा होता डॉक्टर आणि इंजिनीअर नवरा पाहिजे, अशी मुलींची अपेक्षा असायची, पण कोरोना महामारीने सर्वच बदलून गेलं आहे. तशा मुला-मुलींच्या अपेक्षाही बदलताना दिसत आहेत. डॉक्टर म्हटलं की, अत्यावश्यक सेवेसाठी बाहेर जाणं आलंच. सध्याचा कोविड प्रादुर्भाव लक्षात घेता, डॉक्टरऐवजी स्वतःचा व्यवसाय असणारा नवरा असावा. मुलाचा स्वतःचा बिझनेस हवा, असा कल दिसत आहे. तर, मुलांनाही मुलगी नर्स नको. घरातून काम करू शकेल, अशी हवी आहे. मात्र, जी मुलं अथवा मुली डॉक्टर आहेत, त्यांना आपला जोडीदार डॉक्टरच हवा आहे. तर तो परदेशी स्थायिक नको. शक्यतो तो हिंदुस्थानातीलच हवा, अशा अपेक्षा आहेत.

लॉकडाऊन काळात प्रत्यक्ष विवाहनोंदणी करता येत नसल्याने ऑनलाइन मेळावे आम्ही घेतले. आतापर्यंत 20 मेळावे घेतले. त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला. ऑनलाइन मेळाव्यात सहभागी होताना कसं बोललं पाहिजे, आपली अपेक्षा काय, याविषयी सहभागी मुला-मुलींना आम्ही ऑनलाइन प्रशिक्षणही दिलं. या मेळाव्यात सहभागींनी एकमेकांची अनुकूलता पहिली असली तरी प्रत्यक्ष भेट घेऊन निर्णयापर्यंत पोहोचता येईल, असं दिसत आहे. काहींनी व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून संवाद साधले आहेत. पण, लॉकडाऊनमध्ये नवीन नोंदणी झालेली नाही. आता ती हळूहळू सुरू होईल.
डॉ. गौरी कानिटकर, कौऊन्सलर, संचालक अनुरुप विवाह संस्था.

सध्या नवीन नोंदणी झालेली नाही. मात्र, लॉकडाऊनपूर्वी पसंती झालेले दोन विवाह कालच सर्व नियमांचे पालन करून आमच्या संस्थेच्या माध्यमातून पार पडले आहेत. राज्यात जिथे आमचे विवाह संस्थांचे गट आहेत, त्यांच्या व्हॉट्सअप आणि ऑनलाइन मिटिंग आम्ही घेत आहोत. पण, या तीन महिन्यांत नोंदणी झालेली नाही. शिवाय मुलगा किंवा मुलगी डॉक्टर आणि नर्स नको, असेही विचारणारे पालक दिसत आहेत.
डॉ. राजेंद्र भवाळकर, संचालक अक्षदा वधू-वर मंडळ

आपली प्रतिक्रिया द्या