लॉकडाऊनच्या काळातही पालिकेची दमदार कामगिरी; 1,146 डेंग्यूची, 333 मलेरियाची उत्पत्तीस्थाने केली नष्ट

538

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर, लॉकडाऊन असतानाही मुंबईकरांचे आरोग्य चांगले राहावे, यासाठी मुंबई महानगरपालिकेने डेंग्यू आणि मलेरिया या साथीच्या आजारांविरोधात मोहीम सुरू केली आहे. मोहीम सुरू झाल्यापासून 9 दिवसांमध्येच डेंग्यूची 1,146 तर मलेरियाची 333 उत्पत्तीस्थाने शोधून नष्ट करण्यात आली आहेत. महापालिकेच्या कीटकनाशक खात्यातील 1 हजार 500 कामगार, कर्मचारी व अधिकाऱ्यांतर्फे ही मोहीम मुंबईच्या कानाकोपऱ्यात राबवली जात आहे. ही मोहीम पावसाळ्यापर्यंत सुरू राहणार असून यात औषध फवारणी, धूम्र फवारणी, डासांची उत्पत्ती स्थाने शोधून ती नष्ट करणे, यासारख्या विविध उपाययोजना करण्यात येत आहेत.

डेंग्यू, मलेरिया यासारख्या रोगांना आळा बसावा व त्यांच्या प्रसाराला प्रतिबंध व्हावा, यासाठी डासांची उत्पत्तीस्थाने शोधण्याच्या दृष्टीने घरांची व घरांच्या जवळपासच्या परिसराची तपासणी महापालिकेच्या कीटकनाशक खात्याद्वारे नियमितपणे करण्यात येत असते. दरवर्षीप्रमाणे यंदादेखील पावसाळापूर्व तपासणी 13 मे ते 21 मे 2020 या नऊ दिवसांत करण्यात आली. यात तब्बल 1,146 ठिकाणी ‘एडिस एजिप्ती’ (Aedes aegypti) या डेंग्यू प्रसारास कारणीभूत ठरणा-या डासांच्या अळ्या तर 333 ठिकाणी मलेरियावाहक ‘ऍनॉफिलीस स्टिफेन्सी’ (Anopheles stephensi) डासांच्या अळ्या आढळल्या. डासांची ही उत्पत्तीस्थाने तात्काळ नष्ट करण्यात आली, अशी माहिती महापालिकेचे कीटकनाशक अधिकारी राजन नारिंग्रेकर यांनी दिली.

इथे राबवली जाते मोहीम

इमारत परिसरातील पाण्याच्या टाक्या, झोपडपट्ट्यांमधील पाण्याचे पिंप, प्लास्टिक किंवा ताडपत्रीमध्ये साचलेले पाणी, परिसरात पडून असले टायर व त्या टायरमध्ये साचलेले पाणी, झाडांच्या कुंड्यांखालील ताटल्या, शोभिवंत झाडांच्या कुंड्या, पाणी असणाऱ्या शोभेच्या वस्तू, नारळाच्या करवंट्या व त्यात साचलेले पाणी, फेकून दिलेल्या पाण्याच्या बाटल्यामधील किंवा बाटल्यांच्या झाकणांमधील पाणी इत्यादींची तपासणी करण्यात येत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हे सर्वेक्षण करताना मुखावरण (मास्क) वापरणे, हात मोजे (हॅन्ड ग्लोव्हज) वापरणे, शारीरिक दुरीकरण (फिजिकल डिस्टन्सिंग) काटेकोरपणे पाळणे यासारख्या बाबींची परिपूर्ण दक्षता घेतली जात आहे.

उत्पत्तीस्थाने ठरतात घातक

डासांच्या प्रत्येक उत्पत्तीस्थानाच्या ठिकाणी एकावेळी एक मादी डास 100 ते 150 अंडी घालते. एका मादी डासाचे सरासरी आयुष्य हे 3 आठवड्यांचे असते. या तीन आठवड्यांच्या कालावधीत मादी डास किमान ४ वेळा साचलेल्या पाण्यात अंडी घालते. म्हणजेच एका मादी डासामुळे साधारणपणे 400 ते 600 डास तयार होत असतात. हे डास डेंग्यू/मलेरियासारख्या आजारांच्या प्रसारास कारणीभूत ठरतात. पावसाळ्यापूर्वी व पावसाळा दरम्यान पाणी साचलेल्या ठिकाणांची संख्या वाढते, हे लक्षात घेऊन या कालावधीदरम्यान ही कार्यवाही तीव्र केली जाते.

कोरडा दिवस का आणि कसा पाळावा?

साठलेल्या पाण्यात डासांच्या विविध अवस्था या साधारणपणे आठ दिवसांपर्यंत असतात. त्यामुळे घरामध्ये व घराशेजारील परिसरात साठवलेले किंवा साचलेले पाणी सात दिवसांपेक्षा अधिक काळ राहणार नाही, याची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी आठवड्यातून किमान एक दिवस घरातील पाणी साठवण्याची भांडी कोरडी ठेवून कोरडा दिवस पाळणेही अतिशय आवश्यक आहे. पाणी साठवण्याचे पिंप किंवा ड्रम रिकामे करून एक दिवस कोरडे ठेवावे, पिंप कोरड्या व स्वच्छ कापडाने आतून पुसावे. कोरड्या फडक्याने पिंप आतून पुसत असताना ते दाब देऊन पुसावे जेणेकरुन पिंपाच्या आतील बाजूला चिकटलेली डासांची अंडी नष्ट होतील. नंतर या पिंपात पाणी भरल्यावर न विसरता स्वच्छ दुपदरी कपड्याद्वारे पिंपाचे तोंड बांधून ठेवावे.

आपली प्रतिक्रिया द्या