शिक्षण सुरू पण…

गेले सहा-सात महिने शाळा-महाविद्यालयं पूर्णत: बंद आहेत. मुलं घराबाहेरच पडलेली नाहीत पण वर्ष वाया जाऊ नये म्हणून ऑनलाइन शिक्षणाची सोय करण्यात आली आहे. काय वाटते शिक्षकांना याविषयी…

विद्यार्थ्यांनी शिक्षणापासून वंचित राहू नये, त्यांचे चालू वर्ष वाया जाऊ नये तसेच त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात कायम ठेवण्यासाठी शासनाने ऑनलाइन शिक्षण पद्धत सुरू केली. त्यामुळे विद्यार्थी ऑनलाइन पद्धतीने शिक्षण घेत आहेत ही सकारात्मक बाजू आहे. या ऑनलाइन शिक्षणाबाबत शिक्षकांना काय वाटतंय ते त्यांच्याकडून जाणून घेऊया.

कितपत समजतंय त्याचा अंदाज बांधता येत नाही

या वर्षीचे शैक्षणिक वर्ष हे अनिश्चित आणि गोंधळाचे आहे. शिक्षक आणि विद्यार्थी या दोघांमध्येही प्रचंड संभ्रम आहे. शाळा, महाविद्यालये, विद्यापीठ यांपैकी कुणालाच नक्की काय भूमिका घ्यायची हे समजत नाहीये. मुलांचे शैक्षणिक वर्ष थांबू नये, त्यांनी शिक्षणाच्या चौकटीत राहावे यासाठी विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण पद्धती अवलंबली आहे, पण ही शिक्षण पद्धत फार किचकट ठरतेय. जे विद्यार्थी काम करून महाविद्यालयात शिक्षण घेत होते, त्यांनी ऑनलाइन शिक्षणाकडे पाठ फिरवली आहे. कारण वायफाय, इंटरनेटचा खर्च परवडत नाही किंवा चांगल्या दर्जाचा मोबाईल नाही. काहींचे आई-वडील त्यांच्या शिक्षणाची फी कशीबशी कमवून त्यांना पाठवायचे, जेणेकरून ते शिक्षण घेतील. त्यात पालकांच्या नोकऱया गेल्या, पालक आणि मुलं दोघंही घरीच असल्यामुळे त्यांनाही ऑनलाइन शिक्षणाच्या डिवायसेसचा खर्च करणार कुठून? असा प्रश्न पडला आहे. त्यामुळे ज्यांच्या घरी दोन-तीन पाल्य आहेत, त्यांनाही शिक्षण घेताना अडचण येत आहे. खरं तर प्रत्यक्षात शिकवताना शंभर मुलं असली तरी त्यांच्याकडे आपलं लक्ष असतं. शिकवताना एखाद्या विद्यार्थ्याच्या चेहऱयावर रेष आली की, मग त्याला तो विषय समजलेला नाही असे समजून आम्ही तो विषय पुन्हा समजवून सांगायचो. या गोष्टी कुठेतरी कमी पडतायत. ऑनलाइन शिक्षण त्यांना कितपत समजतंय याचा अंदाज बांधता येत नाही. ऑनलाइन शिक्षणात तितका उत्साह येत नाही, जितका प्रत्यक्षात शिकवण्यात येतो. मुलांच्या दृष्टीने सतत ऑनलाइन लेक्चरमुळे त्यांच्या डोळ्यांवर, मेंदूवर ताण येतोय. त्यात शारीरिक ऑक्टिव्हिटी बंद आहेत. त्यामुळे मुलांच्या शारीरिक, मानसिक विकासावर परिणाम होऊ शकतो. मुलं आळशी होतील. प्रात्यक्षिक करणे, मैदानी खेळ खेळणे, विविध उपक्रमांमध्ये सहभाग घेणे यांसारख्या गोष्टींपासून विद्यार्थी वंचित राहतात. त्यामुळे शाळा, कॉलेज सुरू झाल्यावर सोशल डिस्टन्सिंग पाळणं एक आव्हानच असणार आहे. – कांचन परब, के. व्ही. पेंढारकर कॉलेज

शाळा नाही, पण शिक्षण सुरू

सध्याच्या काळात मुलांना शिक्षण प्रवाहात कायम ठेवण्यासाठी ‘शाळा बंद, पण शिक्षण सुरू’ असे केलेले आहे. या परिस्थितीत ऑनलाइन शिक्षण पद्धतीला प्राधान्य देण्यात आले आहे. आज सर्वच शहरी शाळांमध्ये ही शिक्षण पद्धत राबवली जात आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची शाळा भरत नसली तरी शिक्षण मात्र सुरू आहे. ऑनलाइन शिक्षण हे काही ठराविक ऍप्स किंवा ऑप्लिकेशनद्वारे देण्यात येते. आम्ही मोबाईल किंवा संगणकासमोर बसून विद्यार्थ्यांना शिकवत आहोत, परंतु ऑनलाइन शिक्षण पद्धतीत विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या ज्ञानाचा नक्की अंदाज बांधता येणे थोडे अवघडच होतंय. शिवाय प्रात्यक्षिक करणे, मैदानी खेळ खेळणे, विविध उपक्रमांमध्ये सहभाग घेणे यांसारख्या गोष्टींपासून विद्यार्थी वंचित राहत आहेत. या परिस्थितीत शाळा-कॉलेज सुरू झालेच तर शिक्षक व शाळा प्रशासनासमोर फार मोठे आव्हान असणार आहे. वेळोवेळी स्वच्छतागृहाची स्वच्छता, वर्गांचे निर्जंतुकीकरण यामध्ये अडचणी येऊ शकतात. तसेच सर्वच विद्यार्थ्यांना पालक शाळेत सोडू शकत नाही. त्यामुळे स्कूल बसेस किंवा इतर वाहनांचा वापर अनिवार्य आहे आणि हे विद्यार्थ्यांच्या आरोग्यास योग्य असणार नाही. त्यामुळे शाळा- कॉलेज सुरू करणे म्हणजे विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळण्यासारखे होईल. – अंतरा लाड, हार्मनी विद्यालय, खारघर

शिक्षणाची वजाबाकी करणारे वर्ष

मुलांना घरबसल्या शिक्षण मिळावे यासाठी ऑनलाइन शिक्षणाची सुरुवात शहरातील शाळांनी आणि मुंबई महानगरपालिकेने केली आहे. ऑनलाइन शिक्षणात अनंत अडचणी आहेत. सर्वात मोठी समस्या आहे इंटरनेटची उपलब्धता आणि स्मार्टफोन. मोबाईलच्या छोटय़ा पडद्यावर बघून शिक्षण घेणे हे डोळ्यांना त्रासदायक आहे. शाळा सुरू केल्यानंतर सोशल डिस्टन्सिंग पाळणे हे विद्यार्थी संख्या पाहता सामान्य शाळांमध्ये अशक्य आहे. स्वच्छतागृहांचा वापर, स्वच्छता पाळणे या कठीण गोष्टी आहेत. स्वतःचा जीव सर्वात महत्त्वाचा असे मानले तर कोरोनाची लस आल्यानंतर जीवन पूर्ववत होईल आणि यंदा वजा झालेले शिक्षण पुढच्या वर्षी घेता येईल. – ज्योत्स्ना कापूसकर, पार्ले टिळक विद्यालय प्राथमिक शाळा

आपली प्रतिक्रिया द्या