सिंधुदुर्गात लॉकडाऊनमध्ये शिथिलता, दुकाने सुरू होणार

485

सिंधुदुर्ग जिल्ह्यात बुधवारपासून लॉकडाऊनमध्ये जिल्हाधिकारी यांनी शिथिलता दिली आहे. मात्र, सायंकाळी 7 ते सकाळी 7 पर्यंत कलम 144 लागू राहणार आहे. बार, रेस्टॉरंट, हॉटेल्स, मॉल वगळता इतर सर्व दुकाने सकाळी 9 ते सायंकाळी 5 या वेळेत सुरू राहतील . सर्व शासकीय कार्यालये, जिल्हानंतर्गत एस. टी. बससेवा व रिक्षाही सुरू राहतील. मास्क न वापरल्यास 200 रुपये दंड आकारला जाणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी दिली.

जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी सांगितले की, राज्य शासनाने बुधवारपासून जिल्ह्यात काय सुरू ठेवावे, काय सुरू ठेऊ नये, याबाबत मार्गदर्शन सूचना जारी केल्या आहेत. त्यानुसार बुधवारपासून जिल्ह्यातील दुकाने सुरू राहणार आहेत. ही दुकाने सकाळी 9 ते सायंकाळी 5 या दरम्यान सुरू राहतील. दोन व्यक्तींमध्ये 6 फुटाचे अंतर ठेवणे बंधनकारक आहे. मात्र, त्याठिकाणी गर्दी झाल्यास दुकाने तात्काळ बंद करून गर्दी पांगविण्यात येणार आहे. जिल्ह्यातील बस सेवा ही सुरू ठेवली जाणार आहे. सोशल डिस्टन्स ठेवत प्रवाशी वाहतूक केली जाणार आहे. 50 टक्के प्रवासी बसमध्ये असणार आहेत. रिक्षा वाहतूक ही सुरू ठेवली जाणार आहे. रिक्षेत चालक आणि दोन प्रवासी अशी नियमावली असेल. घरातून बाहेर पडताना तोंडाला मास्क लावणे बंधनकारक आहे. मास्क न वापरणाऱ्या व्यक्तींकडून 200 रुपये दंड आकारण्यात येणार आहे. आठवडा बाजार सुरू करण्याबाबतही विचार सुरू आहे. त्याबाबत नियमावली तयार करण्याचे काम केले जात आहे.

राज्य शासनाने चौथ्या लॉकडाऊनमध्ये रेडझोन व नॉन रेडझोन असे दोनच झोन जारी केले आहेत. त्यानुसार सिंधुदुर्ग हा नॉन रेडझोन मध्ये येतो. त्यानुसार ही नियमावली असेल. कंटेंमेन्ट झोनमधून येणाऱ्या प्रत्येकास संस्थात्मक अलगीकरनात व उर्वरितांना होम कवारंटाईन करण्यात येणार आहेत. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर नागरिक दाखल झाले आहेत. त्यांना नियमावली समजवण्यासाठी पोलीस व स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या मार्फत ग्रामीण भागात जनजागृती केली जाणार आहे. होम क्वांरटाईनमध्ये असलेल्या नागरिकांना घराबाहेर पडण्यास मनाई आहे. नियमांचे काटेकोरपणे पालन करा, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. ग्रामीण भागामध्ये काही सरपंचांनी स्थानीक स्तरावर दुकान सुरू ठेवण्याबाबत वेळ ठरवून दिली होती. मात्र शासनाच्या नव्या धोरणानुसार जिल्ह्यात सकाळी 9 ते सायंकाळी 5 या दरम्यान दुकान सुरू राहणार आहेत.

सर्व शासकीय कार्यालये राहणार सुरू
गर्दी टाळण्यासाठी शासकीय कार्यालये बंद करण्यात आली होती. राज्य शासनाच्या नव्या निर्देशानुसार बुधवारपासून बंद असलेली शासकीय कार्यालये सुरू राहणार आहेत. यात उपप्रादेशिक परिवहन विभाग(आर टी ओ), रजिस्टर कार्यालय यासह अन्य कार्यालयांचा समावेश आहे. नागरिकांनी सोशल डिस्टनसिंगचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी यांनी केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या