
लॉकडाऊनमुळे संचारबंदी लागू असतानाही मोरेवाडी परिसरात रस्त्यावर गप्पा मारत उभ्या असलेल्या तीन तरुणांना अंबाजोगाई शहर ठाण्यातील पोलीस नाईक गोविंद येलमाटे यांनी हटकले. याच राग आल्याने त्या तिघा तरुणांनी येलमाटे यांना शिवीगाळ करून मारहाण केल्याची धक्कादायक घटना बुधवारी रात्री घडली. त्या तिन्ही तरुणांवर गुन्हा नोंदविण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सध्या सर्वत्र संचारबंदी लागू आहे. नागरिकांनी घरात बसावे यासाठी प्रशासनाकडून सतत जनजागृती सुरु आहे. तरीही त्याकडे दुर्लक्ष करत अंबाजोगाई शहरात अनेक नागरिक विनाकारण फिरताना दिसून येतात. यात तरुणांची संख्या अधिक आहे. बुधवारी रात्री 8.30 वाजता अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यातील कर्मचारी गोविंद अंगद येलमाटे हे एका गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेण्यासाठी मोरेवाडी परिसरातील यशवंत नगर भागात गेले होते. यावेळी त्यांना किशोर कालिदास लोमटे, वैभव बाबू आखाते (दोघेही रा. मोरेवाडी), आणि तुषार नानासाहेब शिनगारे (रा. आवसगाव, ता. केज) हे तीन तरुण संचारबंदीचे आदेश डावलून रस्त्यावर उभे राहून गप्पा मारताना दिसून आले. त्यामुळे येलमाटे यांनी त्या तरुणांना रस्त्यावर का थांबलात असा सवाल केला. याच राग आल्याने त्या तरुणांनी येलमाटे यांना चापाटाने मारहाण करत शिवीगाळ केली. याप्रकरणी गोविंद येलमाटे यांच्या फिर्यादीवरून तिन्ही तरुणांवर कलम 353, 332, 188, 269, 270, 504, 34 आणि राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस निरिक्षक सिद्धार्थ गाडे हे करत आहेत.


























































