
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
लोकसभा निवडणूक 2019 संपली असून 23 मे रोजी झालेल्या मतगणनेमध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. भाजप व सहकारी पक्ष मिळून एनडीएला 352 जागा मिळाल्या आहेत. लोकसभा निवडणुकीमध्ये सरवात महत्त्वाची भूमिका बजावत असते ते ईव्हीएम. यंदा या ईव्हीएमवरून बराच गदारोळ झाला. विरोधकांनी सुरुवातीपासून ईव्हीएमच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. परंतु निकाल लागल्यानंतर निवडणूक आयोग आणि ईव्हीएमवरील गदारोळ कमी झाला आणि विरोधकांनी आपला पराभव मान्य केला. निवडणूक संपल्यानंतर मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणात वापरलेल्या ईव्हीएमचे काय होते? याला कुठे साठवून ठेवले जाते? या ईव्हीएमचा पुन्हा वापर होतो का? पूर्नवापर होत असेल तर याची प्रक्रिया काय असते? या प्रश्नांची उत्तरे आपल्याला माहिती असायला हवी.
मतमोजणीनंतर ईव्हीएम ईव्हीएमचे काय होते हे सांगण्यापूर्वी थोडे मागे जाऊ आणि मतदान झाल्यानंतर ईव्हीएमचे काय होते हे पाहूया. मतदान संपताच कडक सुरक्षेमध्ये ईव्हीएमची रवानगी स्ट्रॉन्ग रुममध्ये होते. येथे ईव्हीएम अंधारामध्ये ठेवली जातात. कारण ईव्हीएमचा संपर्क कोणत्याही प्रकारे ईलेक्ट्रॉनिक सॉकेटसोबत संपर्क येऊ नये.
मतमोजणीनंतर विजयी आणि पराभूत उमेदवारांची घोषणा झाल्यानंतर पुन्हा एकदा ईव्हीएम स्ट्रॉन्ग रूममध्ये ठेवण्यात येते आणि सिलबंद करून रूम बंद करण्यात येते. यावेळी उमेदवारांचे प्रतिनिधी उपस्थित असतात आणि यावर त्यांची स्वाक्षरीही असते. याबाबत निवडणूक अधिकारी सांगतात, निवडणुकीच्या निर्णयांची घोषणा झाल्यानंतर उमेदवारांना 45 दिवसांचा अवधी दिला जातो, यादरम्यान मतगणना प्रक्रियेवर त्यांना संशय असेल तर ते पुन्हा एकदा मतमोजणीची मागणी करू शकतात.
45 दिवस ईव्हीएम स्टॉन्ग रुममध्ये जवानांच्या पहाऱ्याखाली सुरक्षितरित्या ठेवण्यात येते. 45 दिवसानंतर ईव्हीएम सुरक्षितरित्या स्टोरेज रुममध्ये नेण्यात येते, येथे निवडणूक आयोगाचे इंजिनिअर ईव्हीएमची तपासणी करतात. सर्व काही ठिक असल्याचे निदर्शनास आल्यानंतर हे ईव्हीएम पुन्हा एकदा निवडणुकीसाठी सज्ज होते.
निवडणूक अधिकारी सांगतात, निवडणुकीमध्ये वापरण्यात येणारे 20 टक्के ईव्हीएम रिझर्व्ह ठेवण्यात येतात. कारण काही ठिकाणी तांत्रिक कारणांमुळे ईव्हीएम खराब झाल्यास तेथे याचा पुरवठा केला जाऊ शकतो. ईव्हीएममध्ये कोणत्याही प्रकारची छेडछाड असंभव असल्याचे ते म्हणाले.


























































