…म्हणून दोन नवनिर्वाचित खासदार कामकाजापासून राहणार दूर

नवनिर्वाचित लोकसभेत निवडून आलेले बाबा अमृतपाल आणि इंजिनियर रशीद हे दोघे खासदार सध्या दहशतवादाच्या आरोपाखाली तुरुंगात कैदेत आहेत. त्यांना संसद सदस्य म्हणून शपथ घेण्याचा घटनात्मक अधिकार असला तरी कैदेत असल्यामुळे सभागृहाच्या कामकाजात प्रत्यक्ष सहभागी होता येणार नाही.

खलिस्तानवादी कट्टरपंथी अमृतपाल सिंग यांनी पंजाबच्या खडूर साहिब मतदारसंघातून विजय मिळवला, तर दहशतवादी कारवायांसाठी वित्तपुरवठा करणारे शेख अब्दुल रशीद तथा इंजिनियर रशीद हे कश्मीरच्या बारामुल्ला मतदारसंघातून विजयी झाले आहेत. रशीद हे 9 ऑगस्ट 2019पासून तिहार तुरुंगात टेरर फंडिंगच्या आरोपाखाली गजाआड आहेत. अमृतपाल सिंगला एप्रिल 2023मध्ये राष्ट्रीय सुरक्षा कायद्या अंतर्गत अटक करून आसामच्या दिब्रुगड तुरुंगात पाठवण्यात आले होते.

घटना काय सांगते

घटनातज्ञ आणि लोकसभेचे माजी सरचिटणीस पीडीटी आचारी यांच्या मते, खासदार म्हणून शपथ घेणे हा घटनात्मक अधिकार आहे. मात्र हे दोघे पैदी असल्यामुळे त्यांना शपथविधीसाठी संसदेत नेण्यासाठी अधिकाऱयांची परवानगी घ्यावी लागेल. शपथ घेतल्यानंतर त्यांना पुन्हा तुरुंगात जावे लागेल. ते म्हणाले की, शपथ घेतल्यानंतर सभापतींना पत्र लिहून सभागृहात उपस्थित राहू शकत नसल्याची माहिती या दोघांना कळवावी लागेल. त्यानंतर सभापती त्यांच्या विनंत्या सदस्यांच्या अनुपस्थितीबाबत सभागृह समितीकडे पाठवतील.