शिवसैनिकांची जिद्द आणि निष्ठेच्या बळावर दक्षिण-मध्य मुंबईत गद्दाराला गाडला

दक्षिण-मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील मिंधे गटाचे उमेदवार राहुल शेवाळे यांना निवडणुकीत गाडण्याचा विडाच शिवसैनिकांनी उचलला होता. या विभागातील असंख्य शिवसैनिक, महिला आघाडी आणि कडवट शिवसैनिकांनी जिद्द आणि निष्ठेच्या बळावर अखेर गद्दाराला गाडले व अनिल देसाई यांच्या गळ्यात विजयाची माळ घातली.

दक्षिण-मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे अनिल देसाई आणि मिंधे गटाचे राहुल शेवाळे यांच्यात लढत होती. शिवसैनिकांनी मेहनत घेत अनिल देसाई यांच्या विजयाचा मार्ग सुकर केला. मिंधे गटाने या निवडणुकीत धनशक्तीचा प्रचंड वापर केला. पण गद्दारांना गाडणार म्हणजे गाडणारच असा निश्चय शिवसैनिकांनी केला होता. जिद्द आणि निष्ठsच्या बळावर आम्ही गद्दाराला गाडले, असे विभाग क्रमांक 9चे विभागप्रमुख प्रमोद शिंदे म्हणाले.

शीव कोळीवाडय़ात भाजपने ताकद लावली होती. या विभागातील काहींनी गद्दारी करून मिंधे गटात प्रवेश केला होता. पण शिवसेनेचा हा पारंपरिक मतदारसंघ आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निष्ठा असलेले शिवसैनिक या विभागात प्रचंड संख्येने आहेत. शिवसैनिक जिद्दीने उतरला त्यामुळे या भागात शिवसेनेला भरघोस मतदान झाले, असे शीव कोळीवाडा विभागाचे विधानसभा प्रमुख गोपाळ शेलार म्हणाले.

चिता पॅम्प भागात उद्धव ठाकरे यांची विराट जाहीर सभा झाली होती. या सभेने विभागातील वातावरण बदलून गेले. राहुल शेवाळे सुरुवातीला अणुशक्ती नगरमधील महाराष्ट्र नगरमधून नगरसेवक म्हणून निवडून आले. चार वेळा पालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष झाले. खासदार झाले. पण त्याच अणुशक्ती नगरने गद्दारीला धडा शिकवला आणि अनिल देसाई यांना 29 हजारांचे लीड दिले. अणुशक्ती नगर, चेंबूर आणि शीव कोळीवाडा विधानसभा मतदारसंघातील मते निर्णायक ठरल्याचे प्रमोद शिंदे यांनी सांगितले.

n दादर-माहीम, शिवाजी पार्क तर शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. शिवसेनेचा जन्मच या विभागात झाला. त्यामुळे येथील शिवसैनिकांना गद्दारी अजिबात सहन होत नाही. गद्दाराला गाडायचा चंगच शिवसैनिकांनी केला होता. लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने ही संधी चालून आली आणि गद्दाराला जागा दाखवून दिली. धारावी  पुनर्विकासाच्या मुद्दय़ावरून धारावीकरांमध्ये आधीच प्रचंड नाराजी होती. धारावीकरांसाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विराट मोर्चा काढला होता. त्याशिवाय निवडणूक प्रचारसभाही घेतली. शिवसैनिकांनी जीव तोडून मेहनत घेतली. धनशक्तीच्या विरोधात शिवसैनिक नेटाने उभे ठाकले होते. माहीम, धारावी आणि वडाळा भागातील प्रत्येक शिवसैनिकाचा विजयामध्ये मोलाचा वाटा आहे, असे विभाग क्रमांक दहाचे विभागप्रमुख महेश सावंत म्हणाले.