राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांना 2024च्या लोकसभा निवडणुकीत जनतेने सपशेल नाकारले आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी गटाने लोकसभा निवडणुकीत पाच जागा लढवल्या. रायगड मतदारसंघ वगळता त्यांना अन्य चार जागांवर दारुण पराभव पत्करावा लागला आहे. रायगडमध्ये सुनील तटकरे हे विजयी झाले आहेत. अजित पवार यांनी शिरूरमधून शिवाजीराव आढळराव-पाटील, बारामतीमधून सुनेत्रा पवार, धाराशीव मतदारसंघातून अर्चना पाटील आणि आपल्या कोटय़ातील एक जागा परभणी मतदारसंघात राष्ट्रीय समाज पक्षाचे उमेदवार महादेव जानकर यांच्यासाठी सोडली होती, परंतु या चारही ठिकाणी त्यांचा दारुण पराभव झाला आहे. याआधीच्या लोकसभा निवडणुकीत मुलगा पार्थ पवार आणि आता पत्नी सुनेत्रा पवार यांचा दारुण पराभव झाल्याने अजित पवार यांच्या राजकीय कारकीर्दीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.