
सामना ऑनलाईन, नवी दिल्ली
लहान मुलींवरील लैंगिक अत्याचाराच्या घटना मोठय़ा प्रमाणावर घडत असताना आज लोकसभेने १२ वर्षांखालील मुलींवर अत्याचार करणाऱयांना फाशीची शिक्षा देणारे दुरुस्ती विधेयक आवाजी मतदानाने एकमुखाने मंजूर केले.२१ एप्रिल रोजी लोकसभेत मांडलेल्या विधेयकात दुरुस्ती करून आज लोकसभेने बलात्काराच्या घटना रोखण्याच्या दृष्टीने एका महत्त्वपूर्ण विधेयकाला मंजुरी दिली.
जम्मू-कश्मीरमधील कथुआ तसेच उत्तर प्रदेशातील उन्नाव येथील बलात्काराच्या घटनांनंतर लहान मुलींवर अत्याचार रोखण्यासाठी कडक कायदा करण्याची मागणी समाजाच्या सर्वच स्तरांतून करण्यात येत होती. हे दुरुस्ती विधेयक सभागृहात मांडताना केंद्रीय गृहराज्यमंत्री किरेन रिजीजू यांनी या विधेयकामुळे लहान मुलींवर अत्याचार करणाऱया दुष्ट प्रवृत्तींना चाप बसेल असा विश्वास व्यक्त केला. तृणमूल काँगेसचे सौगात राय, राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे, भाजपच्या किरण खेर तसेच आर. एस. पी.चे एम. जी. प्रेमचंद्रन, माकपाच्या श्रीमती टीचर यांनीही या विधेयकावर आपली मते मांडली. त्यानंतर विरोधकांच्या काही दुरुस्ती सूचना स्वीकारून लोकसभेने आवाजी मतदानाने या दुरुस्ती विधेयकाला मंजुरी दिली.
‘मॉब लिंचिंग’ करणाऱयांनाही फाशीसाठी विधेयक लवकरच
अल्पवयीन मुलींवर अत्याचार करणाऱया नराधमांप्रमाणेच ‘मॉब लिंचिंग’ करणाऱयांनाही फाशीची शिक्षा देण्याचा कायदा करण्यासाठी लवकरच विधेयक मांडण्यात येईल, अशी माहिती केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी सोमवारी येथे दिली. सोलापूर जिल्हय़ातील ‘नाथजोगी’ या भटक्या विमुकत समाजाच्या एका शिष्टमंडळाने भेट घेतली असता अहिर यांनी वरील माहिती दिली. त्या समाजातील पाचजणांना मुले पळवण्याच्या संशयातून जमावाने ठार मारल्याची घटना धुळे जिल्हय़ात गेल्या महिन्यात घडली होती.



























































