जो उचित समझो, वो करो! पंतप्रधानांच्या भाषणाशिवाय लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्ताव मंजूर, संसदीय परंपरेला छेद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लोकसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या चौथ्या दिवशीही दोन्ही सभागृहामध्ये गोंधळ पाहायला मिळाला. चिनी घुसखोरीच्या मुद्द्यावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडले आहे. हा गोंधळ सुरू असतानाच एक अभूतपूर्व घटना घडली आहे. विरोधक आक्रमक झाल्याने सभागृहाचा रागरंग पाहून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषणे देणे सोडाच, सभागृहात येणेही टाळले. त्यामुळे पंतप्रधान मोदी यांच्या भाषणाशिवाय लोकसभेने राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्ताव (Motion of Thanks) मंजूर केला आहे.

संसदेच्या परंपरेनुसार, राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर चर्चा झाल्यावर पंतप्रधान त्याचे उत्तर देतात आणि मगच प्रस्ताव मंजूर होतो. मात्र, गदारोळ न थांबल्यामुळे सभापती ओम बिर्ला यांनी पंतप्रधानांच्या भाषणाशिवाय हा प्रस्ताव मतदानाला टाकून मंजूर केला. लोकसभेतील गदारोळ आणि घोषणाबाजीच्या वातावरणात राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्ताव आवाजी मतदानाने मंजूर करण्यात आला. यामुळे संसदीय परंपरा मोडीत निघाली आहे.

दरम्यान, लोकसभेत बोलण्याची संधी हुकली असली, तरी पंतप्रधान मोदी आज राज्यसभेत या प्रस्तावावर उत्तर देण्याची शक्यता आहे.

माजी लष्करप्रमुख एम.एम. नरवणे यांच्या ‘फोर स्टार्स ऑफ डेस्टिनी’ या अप्रकाशित पुस्तकातील मुद्द्यांवरून संसदेत गेल्या दोन दिवसांपासून गदारोळ सुरू आहे. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी या पुस्तकाचा संदर्भ देत हिंदुस्थान-चीन सीमावादावर बोलण्याचा प्रयत्न केला. राहुल गांधींनी अप्रकाशित दस्तऐवजांचा वापर करू नये, असा आक्षेप घेत सत्ताधारी बाकांवरील मंत्र्यांनी त्यांना रोखले. यामुळे सभागृहात प्रचंड गदारोळ झाला.

विरोधी खासदारांनी वेलमध्ये येऊन जोरदार घोषणाबाजी केली. यामुळे सभागृहाचे कामकाज वारंवार तहकूब करावे लागले. गुरूवारीही दोन वेळा कामकाज तहकूब करावे लागले. एकीकडे हा गदारोळ सुरू असताना पंतप्रधान मोदी यांच्या भाषणाशिवाय लोकसभेने राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्ताव मंजूर केला.

सत्ताधाऱ्यांचा धुडगूस, विरोधकांचेही प्रत्युत्तर; विरोधी पक्षातील महिला खासदारांचा रुद्रावतार! मोदींनी सभागृहात येणे टाळले