मतदार याद्यांचा विषय संसदेत तापला, प्रचंड गदारोळामुळे लोकसभेचे कामकाज केवळ 12 मिनिटे चालले

बिहारमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार याद्यांच्या फेरतपासणीच्या नावाखाली केंद्रीय निवडणूक आयोगाने तब्बल 51 लाखांहून अधिक मतदारांची नावे वगळवली. त्यामुळे संतापलेल्या विरोधकांनी आज चौथ्या दिवशीही संसदेच्या दोन्ही सभागृहांत मोदी सरकारला धारेवर धरले. प्रचंड घोषणाबाजी आणि गदारोळामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांचे कामकाज चालू शकले नाही. लोकसभेचे कामकाज केवळ 12 मिनिटे चालले.

विरोधकांनी अध्यक्षांसमोरील मोकळ्या जागेत येऊन सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी सुरू केली. त्यामुळे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी कामकाज थेट दुपारी दोन वाजेपर्यंत तहकूब केले. त्यानंतरही गोंधळ सुरूच राहिल्यामुळे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले. राज्यसभेतही गोंधळाची मालिका सुरूच राहिली. येथे सुरुवातीला कामकाज दुपारी बारा आणि त्यानंतर दोन तसेच नंतर दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.  दरम्यान, राज्यसभेच्या 5 खासदारांचा कार्यकाळ आज संपुष्टात आला. यात एम. मोहम्मद अब्दुल्ला, एन. चंद्रशेखरन, एम. षणमुगम, वाइको, पी. विल्सन यांचा समावेश आहे.

फलक झळकावले तर  कामकाज चालणार नाही, बिर्ला संतापले

सभागृहात फलक झळकावले तर कामकाज चालणार नाही, अशा शब्दांत लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी विरोधकांना इशारा दिला. काँग्रेस खासदारांकडे संस्कार नसल्याचे म्हणत अध्यक्षांनी दिवसभरासाठी कामकाज तहकूब केले तर राज्यसभेचे कामकाज केवळ पाऊण तास चालले. विरोधकांनी सलग तिसऱया दिवशी संसदेबाहेर सरकारविरोधात निदर्शने केली.

इंडिया आघाडीचे पायऱ्यांवर आंदोलन

बिहारमधील मतदार याद्यांतील घोळावरून सरकारविरोधी घोषणाबाजी करत इंडिया आघाडीच्या खासदारांनी सेंट्रल विस्टाच्या पायऱ्यांवर जोरदार आंदोलन केले. विरोधकांनी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. आंदोलनात काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यादेखील सहभागी झाल्या.