
नागपूर येथील विधान मंडळातील मंत्री परिषद बैठक सभागृहात बुलढाणा जिल्हा आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी गृहमंत्री एकनाथ शिंदे, उद्योग मंत्री सुभाष देसाई, खासदार प्रतापराव जाधव, खासदार विनायक राऊत, आमदार सर्वश्री डॉ. संजय रायमूलकर, संजय गायकवाड, प्रधान सचिव भुषण गगराणी, विभागीय आयुक्त पियुषसिंग, जिल्हाधिकारी सुमन चंद्रा, जिल्हा परिषदेचे प्र. मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश लोखंडे आदींसह विविध विभागांचे सचिव, विभागप्रमुख, अधिकारी उपस्थित होते.
या प्रसंगी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, पाणी पुरवठा योजना पूर्ण करण्यासाठी पाणीपुरवठा विभागाने कार्यवाही करावी. जिल्ह्यात मंजूर असलेली कामे संथगतीने सुरू असल्यास ती गतीने पुर्ण करण्यात येतील. तसेच लोणार विकास आराखडा पूर्ण करण्याबाबत कार्यवाही करण्याच्या सूचना करीत मुख्यमंत्री म्हणाले, सिंदखेडराजा व लोणार हे माझ्या जिव्हाळ्याचे विषय आहे. त्यामध्ये काही सुधारणा करायच्या असल्यास त्या जरूर करू. तसेच लोणार सरोवर परिसरात स्वच्छता राखावी. पर्यटकांना जास्तीत जास्त सुविधा आराखड्यातंर्गत देण्यासाठी काम करावे. हे दोन्ही आराखडे पूर्ण करण्यात येतील. अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकर्यांना मदतीचे वाटप पूर्ण करण्यात येईल. त्यासाठी शासन निधी कमी पडू देणार नाही. नुकसान झालेल्या शेतकर्यांना विमा कंपन्यांनी मदत द्यावी, असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.
पेनटाकळी प्रकल्पाच्या उर्वरित कामांसाठी सुधारीत प्रशासकीय मान्यता देण्याची कार्यवाही करावी असे मुख्यमंत्री यांनी निर्देश दिले. या बैठकीत आमदार संजय रायमूलकर यांनी डोणगाव ता.मेहकर पाणी पुरवठा योजनेस सुधारीत प्रशासकीय मान्यता देण्यात यावी, लोणी लव्हाळा व इतर गावे व देऊळगाव साकर्शा व इतर गावांचा प्रादेशिक पाणी पुरवठा योजतेत समावेश करण्यात यावा. मेहकर शहराची हद्दवाढ करण्यात यावी. लोणार येथे 132 के. व्ही. सबस्टेशन मंजूर करण्यात यावे. कोराडी प्रकल्पाअंतर्गत येणार्या कालव्यांची दुरुस्ती करण्यात यावी. लोणार पंचायत समिती व मेहकर पंचायत समिती इमारत बांधकामासाठी निधी उपलब्ध करून देण्यात यावा. मेहकर ग्रामीण रुग्णालयाचे श्रेणीवर्धन करून उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा द्यावा. मतदारसंघातील रेशन धान्य पुरवठा नियमित होत नाही तो नियमितपणे करण्यासाठी संबंधित विभागाला सूचना द्याव्यात तसेच मेहकर व लोणार एमआयडीसी मध्ये मोठ्याप्रमाणात अतिक्रमण झाले असून ते तात्काळ काढण्यात यावे अश्या अनेक मागण्या मुख्यमंत्री यांच्यासमोर केल्या. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संबंधितांना सूचना केल्या. याप्रसंगी खासदार प्रतापराव जाधव म्हणाले, अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतीचा सर्वे हा विमा कंपन्यांनी देखील ग्राह्य धरावा. सिंदखेडराजा विकास आराखड्यासाठी निधी देवून आराखड्यातील कामे पूर्ण करण्यात यावी, तसेच जिल्ह्यात कर्जमाफीपासून वंचित असलेल्या शेतकर्यांना रब्बी हंगामासाठी पिक कर्ज वितरण करण्यात यावे, अशी मागणी केली. यावेळी प्रधान सचिव भूषण गगरानी यांनी संबंधित विषयासंदर्भात याठिकाणी कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या. जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांनी सादरीकरण केले. बैठकीला संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.




























































